केवळ आर्थिक वाढ म्हणजे विकास नव्हे : माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे - पाटील
कोल्हापूर – समाजाच्या शाश्वत विकासासाठी आर्थिक विकासाबरोबर मानवी हक्कांचे संरक्षण आणि संवर्धन करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे – पाटील यांनी केले. तसेच केवळ आर्थिक वाढ म्हणजे विकास नव्हे, असेही त्यांनी यावेळी नमूद केले. ताराराणी विद्यापीठाचे उपाध्यक्ष आणि ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक क्रांतिवीर रंगरावदादा पाटील यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त 'क्रांतिवीर रंगरावदादा पाटील' व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
या व्याख्यानमालेत मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश बी. जी. कोळसे पाटील यांनी, ‘मानवी हक्क आणि जागतिक वास्तव’ या विषयावर आठवे पुष्प गुंफले. ताराराणी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष प्राचार्य डॉ. क्रांतिकुमार पाटील या व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी होते.
यावेळी विद्यापीठाचे सचिव प्राजक्त पाटील, उपाध्यक्ष डॉ. एस. एन. पवार, अॅड. प्रकाश हिलगे यांची प्रमुख उपस्थिती होती. न्यायमूर्ती कोळसे-पाटील यांनी युद्ध, दहशतवाद, आर्थिक विषमता, जाती-धर्माच्या आधारावर होणारे भेदभाव आणि लोकशाही मूल्यांचा होत असलेला ऱ्हास ही मानवी हक्कांसमोरील गंभीर आव्हाने असल्याचे सांगितले. त्यांनी व्याख्यानातून क्रांतीवीर रंगरावदादा पाटील यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील आणि सामाजिक जीवनातील कार्याचा गौरव केला. त्यांनी समाजात परिवर्तन घडवण्यासाठी त्यांच्या आणि डॉ व्ही. टी. पाटील यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.
यावेळी क्रांतिवीर रंगरावदादा पाटील यांच्या जयंती निमित्त घेण्यात आलेल्या निबंध लेखन स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांचा प्रमाणपत्र आणि रोख बक्षीसे प्रदान करत सन्मान करण्यात आला. या व्याख्यानाला ताराराणी विद्यापीठाचे विश्वस्त, प्राचार्या डॉ. तेजस्विनी मुडेकर, प्राचार्या राजनंदा देशमुख, मुख्याधापिका शोभा चौधरी, नूतन आतराम यांच्यासह प्राध्यापक, विद्यार्थी आणि नागरिक उपस्थित होते.