हिंदू संस्कृतीचे स्वयंघोषित रक्षक असल्याचा आव दाखवणाऱ्या भाजप सरकारचा हा पहा दुटप्पीपणा : आ. सतेज पाटील
कोल्हापूर - नाताळ सणाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने दैनिकातील जाहिरातीत महाराष्ट्राचे आराध्य दैवत गणपती बाप्पांना थेट सांताक्लॉजच्या रूपात दाखवल्याने आ. सतेज पाटील यांनी ट्वीट करून संताप व्यक्त केला आहे.
आ. सतेज पाटील यांनी म्हटले आहे कि, हिंदू संस्कृतीचे स्वयंघोषित रक्षक असल्याचा आव दाखवणाऱ्या भाजप सरकारचा दुटप्पीपणा पहा...सांस्कृतिक मंत्रालयाच्या जाहिरातीत महाराष्ट्राचे आराध्य दैवत गणपती बाप्पांना थेट सांताक्लॉजच्या रूपात दाखवले आहे. हा प्रकार हिंदू संस्कृतीचा आणि श्रद्धेचा अपमान नाही का? सरकारचा पीआर करण्यासाठी दैवतांचे रूप बदलणे, हेच का स्वयंघोषित संस्कृती रक्षकांचे कर्तव्य ?, श्रद्धा, परंपरा आणि सांस्कृतिक अस्मिता यांचा बाजार मांडून पीआर करण्याची ही वृत्ती आजची नाही. निवडणुकांसाठी “हिंदुत्व” जपणाऱ्या भाजप सरकारने हिंदू भावनांशी केलेला खेळ निषेधार्ह, असल्याची टीका त्यांनी केली आहे.