चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे उघडण्यासंदर्भातील ‘ही’ असेल कार्यपद्धती
12 October 2021, 08:36:55 PM
Share
मुंबई - राज्यातील कोरोना संसर्गाची दुसरी लाट ओसरली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून विविध निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. आता राज्यभरातील चित्रपटगृहे, नाट्यगृहे हे देखील पुन्हा सुरू होत असून, याबाबतची कार्यपद्धती व नियमांचा अध्यादेश शासनाकडून जारी करण्यात आला आहे. याशिवाय, बंदिस्त सभागृहे, मोकळ्या जागेतील कार्यक्रमांना देखील नियंत्रित स्वरूपात सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
चित्रपटगृहे उघडण्यासंदर्भात कार्यपद्धती –
1)प्रतिबंधित क्षेत्रात नाट्यगृह पुन्हा सुरू करण्यासाठी परवानगी दिली जाणार नाही.
2) महसूल, वन, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग तसेच सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या प्रचलित मार्गदर्शक तत्वांनुसार नाट्यगृहांचे नियमन केले जाईल.
3) स्थानिक कोरोना परिस्थिती विचारात घेऊन जिल्हाधिकारी संबंधित शासकीय यंत्रणांशी विचारविनिमय करून निर्बंधांमध्ये वाढ करू शकतील.
4) सुरक्षित अंतराबाबतच्या नियमानुसार प्रवेशद्वारे व समुचित ठिकाणी जमिनीवर खुणा आखण्यात याव्यात.
5) नेमलेल्या व्यक्तींना पडदा, पडद्यामागील वस्तू इत्यादी हाताळण्याची परवानगी देण्यात येईल.
6) नाट्य कलाकार आणि कर्मचारी यांनी नियमितपणे त्यांची स्वत:ची वैद्यकीय तपासणी करून घ्यावी.
7) देखावे, प्रसाधनगृहे आणि रंगभूषा कक्ष यांच्या नियमित स्वच्छतेबाबत वेळापत्रक आखावे, स्वच्छतागृहांची वेळेवर स्वच्छता केल्याची खातरजमा करावी.
8) मास्कचा वापर बंधनकारक, सॅनिटायझर उपलब्ध करून देणे, अतिथींना कलाकारांच्या कक्षात परवानगी दिली जाणार नाही.
9) प्रेक्षागृहाबाहेर, सामाईक क्षेत्रांमध्ये आणि प्रतीक्षा क्षेत्रांमध्ये नेहमी किमान सहा फूट इतके पर्याप्त सुरक्षित अंतर राखावे.
10) गर्दी होऊ नये म्हणून लोकांना अंतर ठेवून रांगेने बाहेर सोडले जावे.
11) नाट्यगृहांचा वापर त्यांच्या एकूण आसन क्षमतेच्या ५० टक्क्यांपेक्षा अधिक करण्यात येणार नाही.
12) सर्व वातानुकूल उपकरणांचे तापमान २४ ते ३० अंश सेल्सिअस या मर्यादेत असले पाहिजे.
बंदिस्त सभागृह, मोकळ्या जागेत होणारे कार्यक्रम पुन्हा सुरू करण्याबाबतची मार्गदर्शन तत्वे –
1) सभागृहात प्रवेश देताना थर्मल टेस्टद्वारे प्रेक्षकांच्या शारीरिक तापमानाची चाचणी घेऊनच प्रवेश देणे ही सभागृह व्यवस्थापनाची, आयोजकांची जबाबदारी असेल.
2) महसूल, वन, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग तसेच सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या प्रचलित मार्गदर्शक तत्वांनुसार नाट्यगृहांचे नियमन केले जाईल
3) बंदिस्त सभागृहाच्या एकुण बैठक क्षमतेच्या ५० टक्के इतक्या मर्यादेपेक्षा प्रेक्षक संख्या जास्त असू नये.
4) बंदिस्त सभागृहातील व्यासपीट व प्रेक्षकंमध्ये शासनाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसार सामाजिक अंतर राखणे (किमान ६ फूट) आवश्यक राहील.
5) बालकलाकारां व्यतिरिक्त सर्व कलाकार, आयोजक व साह्यभूत कर्मचारी वर्गाचे संपूर्ण कोविड प्रतिबंधक लसीकरण झालेले असणे आवश्यक असेल.
6) प्रेक्षकांचे कोविड प्रतिबंध लसीकरण झाले असणे अथवा आरोग्य सेतुवरील त्यांची आरोग्य स्थिती सुरक्षित अशी दर्शवलेली असणे आवश्यक राहील