शिरोळ तालुक्यात बंदला संमिश्र प्रतिसाद; भाजप सरकारच्या विरोधात निदर्शने
11 October 2021, 01:20:49 PM
Share
शिरोळ : कुरुंदवाड, जयसिंगपूर शहरामध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पदयात्रा काढून उत्तर प्रदेश मधील लखीमपूर येथील घटनेचा निषेध व्यक्त केला. दरम्यान, जयसिंगपूर येथे आरोग्य राज्यमंत्री डॉ राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजपच्या केंद्र सरकार आणि उत्तर प्रदेश सरकारच्या विरोधात निदर्शने करून निषेध नोंदविला. एकंदरीत शिरोळ तालुक्यात आजच्या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे दिसून येते.
उत्तर प्रदेश मधील लखीमपुर येथे केंद्रीय गृहराज्य मंत्र्यांच्या मुलाने शेतकरी आंदोलनात गाडी घालून हिंसाचार घडवून आणला आहे. भाजप सरकारकडून शेतकरी कृषी कायद्या विरोधात सुरू असलेले आंदोलन चिरडण्यात आले. या घटनेची देशभरात शेतकरी तसेच विविध पक्षाच्या माध्यमातून संतप्त प्रतिक्रिया उमटली आहे. दरम्यान राज्यातील महाविकास आघाडीकडून आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. त्याला पाठींबा म्हणून शिरोळ तालुक्यात व्यापाऱ्यांनी आपले व्यवहार बंद ठेवले होते. दरम्यान जयसिंगपूर येथे आरोग्य राज्यमंत्री डॉ राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी बंदमध्ये सहभागी होऊन शहरातून महाविकास आघाडीच्या नेत्याबरोबर पदयात्रा काढली. त्यानंतर क्रांती चौकात निदर्शने करण्यात आली.
दरम्यान कुरुंदवाड येथेही महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पालिका चौकापासून पदयात्रा काढली. त्यानंतर शहरातील प्रमुख मार्गावरून निषेध फेरी काढून पालिका चौकात आल्यानंतर भाजप तसेच उत्तर प्रदेश सरकारच्या विरोधात निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी कुरुंदवाडचे नगराध्यक्ष जयराम पाटील, धनपाल अलासे, कुरुंदवाड काँग्रेस शहराध्यक्ष विजय पाटील, शिवसेना तालुका प्रमुख वैभव उगळे, राष्ट्रवादी शहराध्यक्ष तानाजी अलासे, दादासाहेब पाटील आप्पासाहेब जोंग आदींनी भाजप सरकारच्या भूमिकेवर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करून दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी केली. यावेळी मृत शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. कुरुंदवाड शहरातील बंदला व्यापाऱ्यांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला. दरम्यान शिरोळसह ग्रामीण भागात काही ठिकाणी व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेऊन महाराष्ट्र बंद मध्ये सहभाग नोंदवला. यामुळे एकंदरीत शिरोळ तालुक्यात महाराष्ट्र बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे चित्र पहायला मिळाले.
यावेळी कुरुंदवाड येथे उपनगराध्यक्ष दीपक गायकवाड, फारूक जमादार, जय कडाळे, सुनील कुरुंदवाडे, राजू आवळे, शरद अलासे, अर्षद बागवान, बाबासाहेब सावगावे, चंद्रकांत मोरे, बबलू उर्फ अभिजित पोवार, चंदू पोवार, सरफराज जमादार यांचेेेसह विविध पक्ष नेते कार्यकर्तेे शेतकरी व्यापारी सहभागी झाले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कुरुंदवाड जयसिंगपूर शिरोळ पोलिसांनी कडक पोलीस बंदोबस्त ठेवला होता.