इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूर हेरिटेजच्या वतीनं आदर्श शिक्षक पुरस्कारांचं वितरण
13 January 2024, 06:05:14 PM
Share
कोल्हापूर - स्त्रियांना शिक्षणाची दारं खुली करुन देशात शैक्षणिक क्रांती करणारे महात्मा फुले यांना अभिप्रेत असणारे शिक्षक आणि विद्यार्थी निर्माण व्हावेत, यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावेत असं आवाहन आमदार जयश्री जाधव यांनी केलंय. आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण कार्यक्रमात त्या बोलत होत्या. सध्याच्या समाजात महिला देखील कुठंही मागं राहत नाहीत. हेच या महिलांनी या क्लबच्या माध्यमातून दाखवून दिल्याचं गौरवोद्गारही त्यांनी यावेळी काढलेत. इनर व्हील क्लब ऑफ कोल्हापूर हेरिटेजच्या वतीनं, आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. आमदार जयश्री जाधव यांच्या हस्ते शिक्षकांना या पुरस्काराचं वितरण करण्यात आलं. यावेळी, इनर व्हील क्लबच्या अध्यक्षा अंजली पाटील, सचिव सुवर्णा गांधी यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना आमदार जयश्री जाधव यांनी, स्त्री काय करु शकते याचं एक उत्तम उदाहरण म्हणुन क्लबच्या महिलांनी त्यांच्या कार्यातून दाखवून दिल्याचं गौरवोद्गार त्यांनी काढले.ज्या शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेत त्या शिक्षकांच्या कार्याचं कौतुक देखील त्यांनी केलंय. शिक्षकांनी चांगल्या विचाराचे विद्यार्थी घडवावेत, आणि पर्यायानं देश घडवावा. शिवाय स्त्रियांना शिक्षणाची दारं खुली करुन देशात शैक्षणिक क्रांती करणारे महात्मा फुले यांना अभिप्रेत असणारे शिक्षक आणि विद्यार्थी निर्माण व्हावेत. यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावेत असं आवाहनही आमदार जयश्री जाधव यांनी केलंय. इन्नर व्हील क्लबच्या अध्यक्षा अंजली पाटील यांनी, समाजाची निःस्वार्थ भावनेनं आणि निष्ठेनं सेवा करणाऱ्या आणि शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांना त्यांच्या अंगीकृत कामात प्रोत्साहन देण्याच्या तसंच त्यांच्या गुणांचा यथोचित सन्मान करण्याच्या उद्देशानं आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात येतं असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं.
इनर व्हील क्लब ऑफ कोल्हापूर हेरिटेजच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबवण्यात येतायत. क्लबच्या स्थापनेला लवकरच शंभर वर्ष पूर्ण होत आहेत. या निमित्तानं 100 हून अधिक सामाजिक उपक्रम राबवण्याचं आमचं ध्येय असून ते लवकरच पूर्ण होईल. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. याशिवाय आमदार ऋतुराज पाटील यांच्याकडूनही क्लबच्या उपक्रमाला प्रत्येक वेळी सहकार्य मिळतंय. याबद्दल त्यांनी आमदार ऋतुराज पाटील यांचं विशेष आभार मानले. यावेळी एकुण 52 शिक्षकांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. या कार्यक्रमाला इनर व्हील क्लब ऑफ कोल्हापूर हेरिटेजच्या खजानिस शैलजा पाटील, प्राजक्ता करमळकर, अर्चना चौगले, अजिंक्यतारा कार्यालयातील जनसंपर्क अधिकारी डी डी पाटील, सतिश बरगे आदी उपस्थित होते.