पत्रकार तुषार खरात यांच्यावरील कारवाईचा कोल्हापूर प्रेस क्लबच्या वतीने निषेध...
12 March 2025, 05:23:41 PM
Share
कोल्हापूर - सातारा जिल्ह्यातील मुक्त पत्रकार तुषार खरात यांच्या विरोधात अतितातडीने दाखल केलेल्या हक्कभंगामुळं तसंच पोलिस ठाण्यात अनेक कलमांतर्गत दाखल केलेल्या गुन्ह्यांमुळं लोकशाहीची होणारी पायमल्ली रोखा, तसंच खरात यांच्या वरील खोटे गुन्हे मागं घेऊन त्यांना न्याय देण्यात यावा, अशी मागणी कोल्हापूर प्रेस क्लबच्या वतीनं करण्यात आलीय.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावानं असलेलं हे निवेदन अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांना कोल्हापूर प्रेस क्लबच्या शिष्टमंडळाच्या वतीनं देण्यात आलं. तुषार खरात यांना आकसानं गुन्ह्यात अडकवून कायद्याचा गैरवापर करणं हे चुकीचं आहे. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्तिगत बदनामीचा गुन्हा दाखल करणं एकवेळ ठीक आहे. पण खरात यांनी तुरुंगाच्या बाहेरच येऊ नये अशाप्रकारची गंभीर कलम लावून तुषार खरात यांना अटक करण्यात आलीय हे वास्तव नाकारता येत नाही असं या निवेदनात नमूद करण्यात आलंय.
मंत्री जयकुमार गोरे यांच्यासंदर्भात बातमी केल्यानंतरच हे सर्व गुन्हे एकदम दाखल करण्यात आलेयत. त्यामुळं, तुषार खरात यांना न्याय मिळावा अशी मागणी करत, त्यांच्यावरील चुकीच्या कारवाईचा यावेळी निषेध करण्यात आला. या शिष्टमंडळात कोल्हापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष शितल धनवडे यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.