पोलिस बंदोबस्तात सीपीआर आवारातील अतिक्रमण हटवण्याची मोहिम…
19 January 2025, 04:18:39 PM
Share
कोल्हापूर - गेल्या अनेक वर्षांपासून सीपीआरच्या आवारात असणारी अतिक्रमणं काढण्यात यावी, अशी मागणी होतेय. मात्र न्यायालयीन प्रक्रियेमुळं याला विलंब होत होता. दरम्यान दोन महिन्यापूर्वी न्यायालयाची स्थगिती उठल्याचं स्पष्ट झाल्यानंतर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी पंधरा दिवसापूर्वी बैठक घेवून सीपीआर आवारातील अतिक्रमण हटवा, अशी सक्त सूचना सीपीआर प्रशासनाला दिली होती. त्यानुसार आज सकाळी सीपीआर आवारातील अतिक्रमण हटाव मोहिमला प्रारंभ झाला. यावेळी कोणताही वादावादीचा प्रसंग घडू नये, यासाठी या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एस. के. कन्हेरकर आणि राजारामपुरीचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण हे मोठ्या पोलीस फौज फाट्यासह सकाळपासून सीपीआर आवारात दाखल झाले होते.
सीपीआर आवारात अतिक्रमण करून उभारण्यात आलेली खाद्य पदार्थ, विक्रेत्यांची खोकी काढण्यात येणार असल्यानं काही विक्रेत्यांनी सकाळी लवकर आपआपलं अतिक्रमण काढून घेण्यास सुरुवात केली. मात्र गेली अनेक वर्ष या ठिकाणी व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांचा या अतिक्रमण हटाव मोहिमेला विरोध होता. त्यातच दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर हे सीपीआर आवारात आले. त्यांनी या ठिकाणी राजर्षी शाहू शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर सत्यवान मोरे यांना बोलवून घेतलं. यावेळी क्षीरसागर यांनी कोणतीही नोटीस न देता अशा प्रकारे अतिक्रमण काढता येणार नाही. त्यांना पर्याय उपलब्ध करून द्या. अतिक्रमण धारकांनीही प्रशासनाला सहकार्य करा आणि तडजोडीतून मार्ग काढा, असं सांगितलं.या मोहिमेवेळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती, दुपारनंतर मोहिम तूर्तास स्थगित करण्यात आली आहे.