नांदेडच्या रिसनगाव आश्रमशाळेत आरक्षण वाद- पालक आक्रमक, २१ विद्यार्थ्यांची नोंदणी रद्द

नांदेड – राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा पेटला असून त्याचे पडसाद आता शाळांच्या प्रांगणातही उमटू लागले आहेत. नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील रिसनगाव येथील आश्रमशाळेत मराठा पालकांनी आक्रमक पवित्रा घेत २१ विद्यार्थ्यांचे ट्रान्सफर सर्टिफिकेट (टी.सी.) काढण्याचा निर्णय घेतला आहे.
➡️ वादाचं मूळ कारण काय? -
अखिल भारतीय वीरशैव शिवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मनोहर धोंडे हे या शाळेचे संस्थाचालक आहेत. त्यांनी मराठा आरक्षणाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ‘मनोहर धोंडेंना आमच्या समाजाचं कल्याण नकोय, म्हणूनच त्यांनी आरक्षणाविरोधात याचिका दाखल केलीय. ज्यांनी आमच्या हक्काला विरोध केला, त्यांच्या शाळेत आमची मुलं का शिकवायची?’ असा सवाल करत अनेक पालकांनी शाळेत जाऊन आपल्या पाल्यांची नोंदणी रद्द केली. एकूण २१ विद्यार्थ्यांची टी.सी. मागितली.