बंजारा समाजाच्या एसटी आरक्षणाच्या मागणीवरून महायुतीत तणाव- आमश्या पाडवींचा सरकारला थेट इशारा

<p>बंजारा समाजाच्या एसटी आरक्षणाच्या मागणीवरून महायुतीत तणाव- आमश्या पाडवींचा सरकारला थेट इशारा</p>

मुंबई  – राज्यात मराठा आरक्षणावरून आधीच वातावरण तापले असताना आता बंजारा समाजाने 'हैदराबाद गॅझेट'च्या आधारे अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गात समावेश करण्याची मागणी केल्यानं नवीन वाद निर्माण झालाय. यावर “बंजारा आणि धनगर समाजाला जर एसटी आरक्षण दिलं, तर मी सरकारमधून बाहेर पडणार.” असा इशारा शिवसेनेचे नंदूरबारचे आदिवासी आमदार आमश्या पाडवी यांनी सरकारला दिलाय.

राज्य सरकारने मराठा समाजासाठी 'हैदराबाद गॅझेट'चा आधार घेऊन कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू केलीय. त्याच धर्तीवर बंजारा समाजानेही त्यांना एसटी प्रवर्गात समाविष्ट करावं अशी मागणी केलीय.  धनगर समाजानेही अशीच दीर्घकालीन मागणी केलीय.

यावर आमदार आमश्या पाडवी म्हणाले, “हैदराबाद गॅझेट लागू झालं म्हणून कोणीही आदिवासी होणार नाही. आदिवासी बनण्यासाठी आदिवासीच्या पोटी जन्म घ्यावा लागतो. आंदोलनं करून कोणीही आदिवासी होणार नाही. मी आमदार असेपर्यंत बंजारा आणि धनगर समाजाला आदिवासी प्रवर्गात घेऊ देणार नाही.” आमदार आमश्या पाडवी यांच्या या भूमिकेमुळे राज्य सरकारसमोर नवीन अडचण उभी राहू शकते. महायुती सरकारमध्ये तणावाची शक्यता वाढलीय.