पाकिस्तानची देवी महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात आहे स्थित...जाणून घ्या अधिक... 

<p>पाकिस्तानची देवी महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात आहे स्थित...जाणून घ्या अधिक... </p>

अमरावती –  तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण, पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतातील हिंगलाज ज्वालामुखी देवी ही महाराष्ट्र राज्यात स्थित आहे. 
मुळ बलुचिस्तानची असणारी हिंगलाज ज्वालामुखी देवी ही सध्या महाराष्ट्र राज्यातील अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील हिंगलाजपूर येथे स्थायित आहे. या देवीचा दरवर्षी डिसेंबर महिन्यात मोठा महोत्सव आयोजित केला जातो. यावेळी हजारो भक्त देवीच्या महोत्सवासाठी येत असतात. अशा या देवीची आख्यायिकाही आहे.
हिंगलाज देवीचे मूळ स्थान हे पाकिस्तानातील बलुचिस्तान येथे आहे. फार पूर्वी बलुचिस्तानमध्ये हिंगलाज मातेचा मोठा थाट होता. मात्र कालांतराने हिंगलाज देवीला त्या ठिकाणी चिंता वाटायला लागली. आपल्या खऱ्या भक्ताच्या शोधात ती निघाली असताना ब्रह्मदेवाच्या सांगण्यावरून ती वऱ्हाडातील अकोली नगरीत आली. अकोलीजवळ सत्य अरण्य या जंगलात हिंगलाज मातेला अमृतगीर महाराज देवीची तपस्या करीत असल्याचे त्यांना दिसले. अमृतगीर महाराजांच्या सहकार्याने त्यांनी चिमणाजी भगत या देवीच्या भक्ताची कठीण परीक्षा घेतली. चिमणाजी भगत हे अकोली येथे त्यांच्या बहिणीकडे गुरे चारण्याचे काम करीत होते. अतिशय आजारी असताना चिमणाजी भगत यांना ज्वालामुखी हिंगलाज मातेने दृष्टांत दिला. या दृष्टांतानुसार त्यांनी अमृतगीर महाराजांच्या सहकार्याने हिंगलाज मातेची पालखी अकोली नगरीतून घनदाट अरण्यात नेली. त्यांनी घनदाट जंगलात तीन भव्य परकोट उभारून परकोटाच्या मधात उंबराच्या झाडाखाली मंदिर उभारून मंदिरात इ.सन १३०३ मध्ये देवीची प्राणप्रतिष्ठा केली.
 
तेव्हापासून मंदिर परिसरात असणाऱ्या परिसराला हिंगलाजपूर असे नाव पडल्याची आख्यायिका आहे. या मंदिरामध्ये मंदिराचे संस्थापक चिमणाजी भगत यांची मूर्ती देखील स्थापन करण्यात आली आहे. हिंगलाजपूर येथे नवरात्री निमित्त भाविक दर्शनासाठी गर्दी करतात. यावेळी भक्तांकडून बैलगाड्या ओढण्याची परंपरा आहे. विशेष म्हणजे सध्या पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतात आज देखील हिंगलाज नदीच्या काठावर हिंगलाज मातेचे मंदिर आहे. प्राचीन काळापासून या ठिकाणी असणाऱ्या हिंगलाज मातेच्या दर्शनासाठी पाकिस्तानातील अनेक हिंदू धर्मीय नियमित जातात.