पट्टण कोडोली यात्रेत फरांडेबाबांची भाकणूक… पाऊस, शेतकरी, राजकारण, महागाई यावर दैवी संकेत...!

<p>पट्टण कोडोली यात्रेत फरांडेबाबांची भाकणूक… पाऊस, शेतकरी, राजकारण, महागाई यावर दैवी संकेत...!</p>

पट्टण कोडोली - महाराष्ट्रासह पाच राज्यांमध्ये प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र विठ्ठल-बिरदेव देवस्थान, पट्टण कोडोली येथील वार्षिक यात्रा आजपासून ढोल-ताशांच्या निनादात, पिवळ्याधमक भंडाऱ्याच्या उधळणीने आणि परंपरेनुसार फरांडेबाबा (खेलोबा वाघमोडे) यांच्या भाकणुकीने भक्तिमय वातावरणात सुरू झाली. आज सकाळी मंदिराचे मानकरी गावकामगार पाटील, कुलकर्णी, मगदूम, जोशी, चौगुले, गावडे व पुजारी यांनी परंपरेनुसार फरांडेबाबांना मंदिरात येण्यासाठी निमंत्रण दिले. पायात वाळातोडा, हातात मानाची तलवार आणि छत्र्यांचा सन्मान घेत फरांडेबाबांनी हेडाम खेळत मंदिरात प्रवेश केला. ढोल-ताशा, धनगरी ओव्या, आणि भंडाऱ्याच्या वर्षावात परिसर भक्तिरसात न्हाहून गेला. "विठ्ठल बिरदेवाच्या नावानं चांगभलं !" च्या जयघोषांनी कोडोली निनादून गेली.

➡️ फरांडेबाबांची भविष्यानुमानात्मक भाकणूक -

☑️पर्जन्य: सात दिवसात पाऊस पडेल.

☑️बळीराजा: रोहिणीचा पाऊस आणि मृग नक्षत्रात पेरणी संपूर्ण देशभर होईल.

☑️धारण: पेरणीतील धारण दोन, सव्वा दोन, अडीच अशी आपल्या मनाप्रमाणे होईल.

☑️महागाई: मिरची, रस, भांडे – यांचे दर कडक होतील.

☑️भूमाता (देशभक्ती): भारतीय लष्कराचे शौर्य संपूर्ण जगात चमकेल.

☑️आशीर्वाद: "नवल्या मी होईन, हातात काठी घेऊन स्वतः मेंढ्या राखीन" – म्हणजे भक्तांची काळजी स्वतः घेतो.

☑️राजकारण: राजकारणात उलथापालथ होईल, पण धर्माचं आणि भगव्याचं राज्य येईल.

☑️कांबळा (रक्षण): "माझ्या गुरुचे चरण जो धरतो, त्याला मी सदैव कांबळ्याखाली घेईन."

भाकणूक झाल्यानंतर हजारोंच्या संख्येने जमलेल्या भक्तांनी लोकर, खोबरे, खारीक आणि भंडाऱ्याची मुक्त उधळण करत आपली श्रद्धा व्यक्त केली. संपूर्ण पट्टणकोडोली गाव धर्म, भक्ती आणि परंपरेच्या रंगात रंगून गेला. देवस्थान समिती, पुजारी मंडळी व धनगर समाजाच्या वतीने यात्रेचे सुंदर आयोजन करण्यात आले आहे. पुढील काही दिवस ही यात्रा भाविकांसाठी खुली राहणार आहे.