आईच्या मंदिरात एआयची कमाल...
एआय तंत्रज्ञानामुळे अंबाबाई मंदिरात चोरीच्या उद्देशाने आलेल्या १५ संशयितांना टिपले...

कोल्हापूर - करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी देशभरातून लाखो भाविक कोल्हापुरात येत असतात. याच गर्दीचा फायदा घेत चोरटे महिलांच्या गळ्यातील सोन्या-चांदीचे दागिने, मौल्यवान वस्तू, पर्स आणि मोबाईल हातोहात लांबवत असल्याचा प्रकार मागील अनेक वर्षांपासून नवरात्रोत्सव काळात सातत्याने सुरू होता. यावर उपाय म्हणून पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती, आयआयटी मंडी मध्यप्रदेश आणि वेलोस ग्रुपच्यावतीने यंदा पहिल्यांदाच अंबाबाई मंदिरात आर्टिफिशल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.
एआय तंत्रज्ञानाच्या सहाय्याने नवरात्रोत्सव काळात रेकॉर्डवरील १५ चोरट्यांना डिटेक्ट करण्यात यश आले आहे तर गर्दीत हरवलेल्या ७ भाविकांना त्यांच्या कुटुंबापर्यंत पोहोचवण्यासाठी एआयची मदत झाली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा पहिलाच प्रयोग यशस्वी झाल्याने जवळपास २० लाख भाविकांना कमी वेळेत सुरक्षित दर्शन देता आले, असे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवडे यांनी सांगितले.
यंदा पहिल्यांदाच ए. आय तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून यासाठी मंदिर परिसरातील शेतकरी संघाच्या इमारतीत स्वतंत्र कक्ष उभारण्यात आला होता. या कक्षातून मंदिर परिसरात १४० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने गर्दीवर नियंत्रण ठेवण्यात आले. मंदिरातील एआय प्रणाली हाताळणाऱ्या टीमकडे जिल्हा पोलीस दलाने जिल्ह्यातील रेकॉर्डवरील २१३ गुन्हेगारांचा डेटा दिला होता. मंदिरात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक भाविकावर कॅमेऱ्याची करडी नजर होती. यातूनच चोरीच्या उद्देशाने मंदिरात प्रवेश करणारे चोर एआयच्या माध्यमातून टिपले जात होते. त्यांचं छायाचित्र मॅच झाल्यानंतर बसवलेल्या सिस्टीमकडून नोटिफिकेशनद्वारे याची माहिती तात्काळ पोलीस आणि देवस्थान समितीच्या सुरक्षा व्यवस्थेला कळवली जात होती. यानंतर त्वरित या संशयित व्यक्तीला पोलीस ताब्यात घेत होते. मागील आठ दिवसात १५ जणांचे डिटेक्शन एआयच्या माध्यमातून करण्यात आले आहे. यामध्ये परप्रांतीय महिलांचाही समावेश आहे यात निष्पन्न झालेल्या १५ जणांची जुना राजवाडा पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.