शारदीय नवरात्र उत्सव २०२५ निमित्त महालक्ष्मी मंदिर परिसरात विशेष स्वच्छता मोहीम
मंदिर परिसर स्वच्छतेसाठी दोन शिफ्टमध्ये 28 कर्मचाऱ्यांची नियुक्ती

कोल्हापूर : शारदीय नवरात्र उत्सव २०२५ च्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महानगरपालिकेच्या आरोग्य घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत संपूर्ण पालखी मार्ग आणि नवदुर्गा मंदिरांच्या परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. ही स्वच्छता प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आली.
त्याचबरोबर महालक्ष्मी मंदिर परिसरात नवरात्र उत्सवाच्या कालावधीत भाविकांची होणारी मोठी गर्दी लक्षात घेऊन सकाळी सहा ते रात्री मंदिर बंद होईपर्यंत स्वच्छतेसाठी दोन शिफ्टमध्ये कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये एकूण २८ कर्मचारी नेमण्यात आले आहेत. पहिल्या शिफ्टमध्ये (सकाळी सहा ते दुपारी दोन) १४ कर्मचारी, तर दुसऱ्या शिफ्टमध्ये (दुपारी दोन ते मंदिर बंद होईपर्यंत) १४ कर्मचारी कार्यरत राहून मंदिर परिसर स्वच्छ ठेवण्यात येणार आहे.
या स्वच्छतेच्या कामासाठी चार टिप्पर, एक ट्रॅक्टर तसेच आवश्यकतेनुसार डंपर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. मंदिर परिसर दिवसातून दोन वेळा साफसफाई करण्यात येत असून भाविकांच्या सुविधेसाठी सहा टॉयलेट युनिट्स बसविण्यात आले आहेत. या टॉयलेट्सची स्वच्छता दिवसातून दोन वेळा केली जाणार आहे. तसेच सकाळी महानगरपालिका आणि अनिरुद्ध अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने "स्वच्छता हीच सेवा २०२५" या मोहिमेअंतर्गत महालक्ष्मी मंदिर परिसरात सकाळी सहा पासून स्वच्छता करण्यात आली. ही स्वच्छता सेवा सलग दहा दिवस सुरू राहणार आहे.
या उत्सवाच्या काळात महानगरपालिका व जिल्हा प्रशासनाच्या वतीने प्लास्टिक बंदी उपक्रमाबाबत प्रबोधनात्मक कार्यक्रमही आयोजित करण्यात आले आहेत. ही स्वच्छता मोहीम सहा.आयुक्त कृष्णा पाटील व मुख्य आरोग्य निरीक्षक विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे.