आज पहिल्या दिवशी श्री अंबाबाई देवीची कमलालक्ष्मी माता रूपातील पूजा

कोल्हापूर – आजपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे आजच्या पहिल्या दिवशी श्री अंबाबाई देवीची कमलालक्ष्मी माता रूपातील पूजा मांडण्यात आली आहे.
कमलालक्ष्मी मातेचे सुवर्णाप्रमाणे तेजस्वी कांती वर्ण असून ही देवी दिव्य अलंकाराने तेजस्वी आणि अनुपम सुंदर दिसत आहे.
तिने वरील दोन्ही हातात कमळ धारण केले आहे. तर खाली दोन्ही हात वरदायक व अभयकर आहेत, ही कमळात बसली असून हत्तींनी वेष्टिलेली आहे. ही दशमहाविद्यातील दहावी देवता आहे, हिचा सदाशिव नारायण महाविष्णू असून ही श्रीकुलातील देवी दक्षिणाम्नायपीठस्था आहे.
तिला कमला, लक्ष्मी, दशमी, गजलक्ष्मी, गजेंद्रलक्ष्मी नावाने ओळखले जाते. आजची पुजा श्रीपुजक बाबुराव ठाणेकर, प्रसाद लाटकर, योगेश जोशी यांनी बांधली आहे.