कोल्हापुरातील रुद्रगया तीर्थस्थळी पितृशांतीसाठी भाविकांकडून तर्पण विधी संपन्न

<p>कोल्हापुरातील रुद्रगया तीर्थस्थळी पितृशांतीसाठी भाविकांकडून तर्पण विधी संपन्न</p>

कोल्हापूर – पितृशांती, कालसर्प दोष आणि पत्रिकेतील विविध दोष निवारणासाठी अनेक भाविक नृसिंहवाडी, औदुंबर, नाशिक, त्र्यंबकेश्वर, गया, पुष्कर यांसारख्या तीर्थक्षेत्रांना भेट देतात. मात्र, कोल्हापुरातच असलेल्या रुद्रगया तीर्थक्षेत्राचे आध्यात्मिक महत्त्व आता भाविकांमध्ये पुन्हा एकदा अधोरेखित होत आहे.

☑️श्री लक्ष्मी नारायण मंदिर – ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा :-
महाराणा प्रताप चौक, घिसाड गल्ली परिसरात, दिशा डायग्नोस्टिक आणि देशभूषण हायस्कूल समोर हे मंदिर स्थित आहे. येथे देवतांच्या उजव्या पायांची २१ पावले होत्या, त्यापैकी आजही १३ पावले स्पष्ट दिसतात. मंदिरात श्रीहरी विष्णूची प्राचीन मूर्ती आणि माता पार्वतीचे 'विशालाक्षी' नावाचे अद्वितीय रूप आहे. पार्वतीमातेच्या एका हातात श्री गणेश व दुसऱ्या हातात शिवलिंग असलेली ही मूर्ती अद्वितीय आणि दुर्मीळ मानली जाते. तत्कालीन करवीर नगरीची भूमी, आजही सपाटीपासून सात फूट खाली कुंडरूपात संरक्षित असून भाविकांना ती स्पर्श करून वंदन करता येते.

☑️करवीर महात्म्यानुसार तर्पण विधीचे महत्व :-
करवीर महात्म्य ग्रंथामध्ये वर्णन आहे की, या पवित्र स्थळी कोणत्याही दिवशी, कोणत्याही महिन्यात, सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत जल व काळे तीळ अर्पण करून तर्पण विधी करता येतो. देवतांच्या पावले स्थानावर हे तर्पण अर्पण केल्याने पितरांना शांती मिळते आणि भाविकांवर कृपादृष्टी होते.

☑️१८ सप्टेंबर २०२५ – गुरुपुष्यामृत योगावर तर्पण विधी:-
आर.के. नगर येथील श्रीपाद श्रीवल्लभ एकमुखी दत्त मंदिरात परमपूज्य सद्गुरु शशिकांत अण्णा महाराज यांच्या सत्संग कार्यक्रमात या रुद्रगया तीर्थस्थळाचा उल्लेख झाला. मंदिर व मूर्ती अभ्यासक उमाकांत राणींगा यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवार १८ सप्टेंबर २०२५ रोजी भाविक समुदायांच्या उपस्थितीत विधी पार पडला. या विधीनंतर रुद्रगया तीर्थाचे महत्त्व अधिकच भाविकांमध्ये पोहोचले.  परिणामी रविवारी दिवसभर शेकडो भाविकांच्या मंदिराबाहेर रांगा लागल्या होत्या. भाविकांनी जलतर्पण विधी करून आपल्या पितरांना शांती अर्पण केली.

या आयोजनात शिवलिंग उपक्रमाचे दरबार सचिव दत्ता सुतार, विलासराव सुतार, सुरेश माने, सुनेत्रा सुतार, मनीषा सुतार, चैत्राली वैद्य, मदन सुतार (उद्योजक), राहुल जाधव, पूनम आंबेकर, संगीता वासकर, सुमन पोवार, संभाजी सुतार, प्रफुल्ल लोहार, राजकुमार भोसले, संभाजी साजणीकर यांच्यासह कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला.