शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त श्री महालक्ष्मी अन्नछत्र व धर्मशाळा सुसज्ज

<p>शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त श्री महालक्ष्मी अन्नछत्र व धर्मशाळा सुसज्ज</p>

कोल्हापूर – साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या श्री महालक्ष्मी मंदिरातील शारदीय नवरात्रोत्सव हा कोल्हापूरचा एक अत्यंत भव्य आणि प्रमुख उत्सव आहे. या काळात लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी कोल्हापूरमध्ये दाखल होतात. याच पार्श्वभूमीवर गेल्या १७ वर्षांप्रमाणे यंदाही श्री महालक्ष्मी अन्नछत्रतर्फे परगावाहून येणाऱ्या भाविकांसाठी मोफत भोजनप्रसाद व्यवस्था करण्यात आली आहे. अन्नछत्राची वेळ वाढवून सकाळी ११ ते दुपारी ४ अशी करण्यात आली आहे. याशिवाय कर्मचाऱ्यांची संख्या देखील वाढविण्यात आली आहे. या भोजनप्रसादात मसाले भात, आमटी, भाजी, गव्हाची खीर व ताक हे पदार्थ देण्यात येणार आहेत. नवरात्रौत्सवानिमित्त श्री महालक्ष्मी अन्नछत्र तर्फे ताराबाई रोडवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून स्वागत कमानी उभारण्यात आल्या आहेत. भाविकांसाठी अल्पदरात राहण्याची व्यवस्था करण्यासाठी श्री महालक्ष्मी धर्मशाळा देखील सुसज्ज करण्यात आली आहे. १२५ हून अधिक खोल्यांच्या माध्यमातून सर्व आधुनिक सोईंनी युक्त असलेल्या या धर्मशाळेत भाविकांच्या राहण्याची अल्पदरात व्यवस्था करण्यात येणार आहे. याच बरोबर श्री महालक्ष्मी अन्नछत्र तर्फे दरवर्षी प्रमाणे यावर्षीही ललित पंचमी दिवशी त्र्यंबोली यात्रेनिमित्त भाविकांना त्र्यंबोली देवीच्या दर्शनाला जाण्यासाठी मोफत बससेवा देण्यात येणार आहे. सकाळी ६ ते रात्री ११ या वेळेत बिंदू चौक - टेंबलाई मंदिर - बिंदू चौक अशी ही बससेवा देण्यात येणार आहे. या संपूर्ण व्यवस्थेचे नियोजन श्री महालक्ष्मी अन्नछत्र व धर्मशाळेचे संस्थापक अध्यक्ष राजू मेवेकरी यांनी केले आहे. भाविकांच्या सेवेसाठी त्यांचे हे योगदान निश्चितच स्तुत्य आहे. कोल्हापूरला श्री महालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी या सेवांचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.