शारदीय नवरात्रात अंबाबाई दशमहाविद्या स्वरूपात दर्शन देणार; भक्तांसाठी अनोखा आध्यात्मिक अनुभव

कोल्हापूर - उद्यापासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्र उत्सवात, कोल्हापूरचे आराध्य दैवत श्री अंबाबाई यावर्षी दशमहाविद्या स्वरूपात बांधण्यात येणार आहे. या दशमहाविद्या पैकी ७ स्वरूपात भक्तांना दर्शन देणार असल्याची माहिती श्री पूजक मंडळ यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकाद्वारे दिलीय.
✅दशमहाविद्या म्हणजे काय? -
"दशमहाविद्या" म्हणजे देवीचे दहा अतिप्राचीन, रहस्यमय आणि शक्तीशाली रूप. देवी महात्म्य व तंत्रशास्त्रात वर्णन करण्यात आलेली ही रूपे म्हणजे काली, तारा, षोडशी, भुवनेश्वरी, भैरवी, छिन्नमस्ता, धूमावती, बगलामुखी, मातंगी आणि कमलात्मिका अशी आहेत. देवीच्या दहा स्वरूपांची उपासना अतिशय महत्त्वाची मानली गेली आहे. महा सती गौरीच्या क्रोधातून उत्पन्न झालेल्या तिच्या दहा रूपांना दशमहाविद्या असे नाव आहे. यातील प्रत्येक देवीचे स्वरूप वेगळे असून त्याच्या उपासनेचे फलही वेगळे आहे. देवी महात्म्यात वर्णन केलेल्या या रूपांची महती आणि माहिती देवी भक्तांना समजावी यासाठी या पूजा बांधण्यात येणार आहेत.
✅श्री अंबाबाईंच्या दशमहाविद्या रूपातील पूजा -
➡️सोमवार, २२ सप्टेंबर श्री कमलादेवी
➡️मंगळवार, २३ सप्टेंबर श्री बगलामुखी
➡️बुधवार, २४ सप्टेंबर श्री तारा
➡️गुरुवार, २५ सप्टेंबर श्री मातंगी
➡️शुक्रवार, २६ सप्टेंबर श्री भुवनेश्वरी
➡️शनिवार, २७ सप्टेंबर अंबारीतील विशेष पूजा
➡️रविवार, २८ सप्टेंबर श्री षोडशी (त्रिपुरसुंदरी)
➡️सोमवार, २९ सप्टेंबर श्री महाकाली
➡️मंगळवार, ३० सप्टेंबर श्री महिषासुरमर्दिनी
➡️बुधवार, १ ऑक्टोबर श्री भैरवी
➡️गुरुवार, २ ऑक्टोबर रथारूढ पूजा
✅उत्सवाला भक्तांचा प्रचंड प्रतिसाद अपेक्षित-
नवरात्र महोत्सवात अंबाबाई मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी होणार असून, विविध धार्मिक विधी, महापूजा आणि संस्कृतिक कार्यक्रम यांचं आयोजन करण्यात येणार आहे. दशमहाविद्यांचे साकार रूप पाहण्यासाठी कोल्हापूरसह राज्यभरातून भाविक दाखल होणार असल्याची शक्यता आहे. श्री पूजक मंडळाने भाविकांना शिस्त, स्वच्छता आणि भक्तीभाव राखून दर्शन घेण्याचं आवाहन केलं आहे. अंबाबाई मंदिर परिसरात पोलीस बंदोबस्त आणि स्वयंसेवक व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. या वर्षीचा शारदीय नवरात्र महोत्सव अध्यात्म, भक्ती आणि शक्ती उपासना यांचा एकत्रित संगम ठरणार आहे. दशमहाविद्यांच्या दिव्य स्वरूपात अंबाबाईचं दर्शन घेणं, हे भाविकांसाठी एक अद्वितीय अध्यात्मिक अनुभव असणार आहे, अशी माहिती श्री करवीर निवासिनी अंबाबाई (महालक्ष्मी) हक्कदार श्री पूजक मंडळाचे सचिव माधव मुनिश्वर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिलीय.