शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अंबाबाई मंदिर परिसरात पोलिस अधीक्षकांची पाहणी

<p>शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अंबाबाई मंदिर परिसरात पोलिस अधीक्षकांची पाहणी</p>

कोल्हापूर – येत्या सोमवारपासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी आज करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर परिसराची पाहणी केली. नवरात्रोत्सवात लाखो भाविक दर्शनासाठी येत असल्याने कोणतीही अडचण किंवा अनुचित घटना घडू नये, यासाठी त्यांनी पोलीस यंत्रणेला आवश्यक त्या सूचना दिल्या. यावेळी गुप्ता यांनी सुरक्षा व्यवस्था, गर्दी नियंत्रण, सीसीटीव्ही कॅमेरे यांची तपासणी केली. यंदा प्रथमच AI तंत्रज्ञानाचा वापर करून भाविकांची गर्दी, वाहतूक, व पार्किंग यावर लक्ष ठेवले जाणार आहे. गर्दी कुठे आहे आणि पार्किंग कुठे उपलब्ध आहे, याची माहिती भाविकांना मिळावी यासाठीही तंत्रज्ञानाची मदत घेतली जाईल. भाविकांनी संयम आणि शिस्त राखून सुरक्षित दर्शन घेण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक गुप्ता यांनी यावेळी केले.

यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक धीरजकुमार बच्चू, पोलीस उपअधीक्षक तानाजी सावंत, पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, संजीवकुमार झाडे, देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवाडे, व्यवस्थापक महादेव दिंडे यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.