नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अंबाबाई मंदिरात जय्यत तयारी सुरू

अंबाबाई मंदिर परिसरात यंदा होणार एआय प्रणालीचा वापर...

<p>नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अंबाबाई मंदिरात जय्यत तयारी सुरू</p>

कोल्हापूर - करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून स्वच्छता मोहीम सुरु आहे. आज मंदिराच्या गाभाऱ्याची स्वच्छता करण्यात आल्याने मुख्य मूर्तीचे दर्शन सकाळी साडेनऊ ते सायंकाळी साडे सहा पर्यंत बंद ठेवण्यात आले होते.

या काळात भाविकांनी श्री सरस्वती गाभाऱ्यातील उत्सव मुर्तीचे दर्शन घेतले. आय स्मार्ट पॉसिटिक प्रायव्हेट लिमिटेड यांच्या पंधरा कर्मचाऱ्यांनी संपूर्ण गाभाऱ्याची सफाई केलीय. सफाईवेळी पाण्याचा वापर करावा लागत असल्याने आतील विद्युत पुरवठा बंद करून, विद्युत उपकरणं काढण्यात आली होती. शारदीय नवरात्रोत्सव काळात भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत. यावर्षी पहिल्यांदाच मंदिर परिसरात एआय प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे. या माध्यमातून एखाद्या रेकॉर्डवरील गुन्हेगार जर दर्शन रांगेत किंवा मंदिर परिसरात आला तर सीसीटीव्हीमधून फेस रिडींग द्वारे त्याची ओळख पटवण्यासाठी मदत होणार आहे. त्याचबरोबर या प्रणालीचा गर्दी नियंत्रणासाठी सुद्धा वापर करण्यात येणार आहे. दर्शन मंडप उभारण्याचं काम युध्द पातळीवर सुरु आहे. मंदिर परिसरात विविध रुग्णालयांसह महापालिकेचे वैद्यकीय पथक पुरेसा औषध साठा आणि रुग्णवाहिकेसह सज्ज राहणार आहे. यंदाचा नवरात्रोत्सव प्लास्टीकमुक्त वातावरणात साजरा व्हावा यासाठी देवस्थान व्यवस्थापन समिती मंदिर आवारा आणि परिसरातील विक्रेत्यांना लवकरच सूचना देणार आहे. एकंदरीत करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर परिसरात सध्या नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरु आहे.