सरत्या वर्षात १५ लाख भाविकांनी घेतला श्री महालक्ष्मी अन्नछत्राचा लाभ

<p>सरत्या वर्षात १५ लाख भाविकांनी घेतला श्री महालक्ष्मी अन्नछत्राचा लाभ</p>

कोल्हापूर -  करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी देशभरातून असंख्य भाविक कोल्हापूरमध्ये येतात. अलीकडच्या काळात वर्षभर भाविकांची मोठी गर्दी येथे पाहायला मिळते. या भाविकांसाठी गेल्या १८ वर्षांपासून श्री महालक्ष्मी अन्नछत्रामध्ये मोफत भोजनप्रसाद देण्याचे कार्य अखंडपणे सुरू आहे. त्यामुळे देवीचे दर्शन घेतल्यानंतर भाविकांची पावले आपोआपच श्री महालक्ष्मी अन्नछत्राकडे वळतात.

सरत्या २०२५ वर्षात या अन्नछत्राला प्रचंड प्रतिसाद मिळाला असून सुमारे १५ लाख भाविकांनी मोफत भोजनप्रसादाचा लाभ घेतला. प्रचंड गर्दी असूनही भाविकांना सात्विक, स्वच्छ आणि चविष्ट भोजनप्रसाद मिळाल्यामुळे भाविकांनी समाधान व्यक्त केले.

याचबरोबर श्री महालक्ष्मी धर्मशाळेमध्ये भाविकांसाठी अल्पदरात राहण्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. या वर्षात सुमारे २ लाख भाविकांची निवासाची सोय श्री महालक्ष्मी धर्मशाळेत करण्यात आली. सर्व आधुनिक सोयीसुविधा असूनही कमी दरात उपलब्ध असलेल्या या सुविधेमुळे भाविक समाधानाने घरी परतले.

श्री महालक्ष्मी अन्नछत्र आणि धर्मशाळेचे अध्यक्ष राजू मेवेकरी यांच्या नेतृत्वाखाली ही संपूर्ण यंत्रणा कार्यरत होती. संजय जोशी, राजेश सुगंधी, ॲड. तन्मय मेवेकरी, प्रशांत तहसीलदार, चंद्रशेखर घोरपडे, विराज कुलकर्णी, आदित्य मेवेकरी, सुनील खडके, प्रतीक गुरव, रजत जोशी, अतिश जाधव, ऋतुराज सरनोबत या पदाधिकाऱ्यांसह सुमारे ७५ कर्मचारी अहोरात्र कार्यरत होते. त्यामुळेच एवढी मोठी गर्दी असूनही भाविकांची उत्तम व्यवस्था शक्य झाली.

कोल्हापूरच्या पर्यटनवाढीसाठी श्री महालक्ष्मी अन्नछत्र आणि धर्मशाळेची ही सेवा अत्यंत महत्त्वाची ठरत आहे.