आता चुकाल, तर संपाल...अखेर दोन्ही बंधूंनी केली राजकीय युतीची घोषणा...
मुंबई – आज पत्रकार परिषद घेवून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी आपली राजकीय युती झाल्याचे जाहीर केले आहे. यापूर्वी दोन्ही बंधूंचं मराठीच्या मुद्द्यावरून मनोमिलन झालं होतं. त्यानंतर राज्यातील महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह नाशिकमध्ये दोघांची ही युती झाली आहे.
“मुंबई किंवा महाराष्ट्र वेगळं करण्याचा, किंवा मराठी माणसाला बाजूला सारण्याचा कोणीही प्रयत्न केला, तर त्याचा राजकीय अंत केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही, आता चुकाल, तर संपाल. आता जर फूट पडली, तर संपूर्ण नुकसान होईल. एकत्र रहा, तुटू नका, फुटू नका आणि मराठीपणाचा वारसा सोडू नका,” असा निर्धार उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला.
मुंबईचा महापौर हा मराठीच होणार आणि आमचाच होणार असा विश्वास यावेळी राज ठाकरे यांनी व्यक्त केला. बाकी जे बोलायचं ते आम्ही जाहीर सभांमधूनच बोलू, माझ्याकडे सुद्धा खूप व्हिडिओ असल्याचे सांगत त्यांनी अप्रत्यक्षरित्या भाजपला इशारा दिला. यावेळी खा. संजय राऊत, रश्मी ठाकरे, शर्मिला ठाकरे, आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे असे संपूर्ण ठाकरे कुटुंब उपस्थित होते.