कोल्हापुरात भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांचा उद्रेक; तिकीट नाकारल्याने राजीनाम्याचा निर्णय?
कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये अंतर्गत नाराजी उफाळून येत असल्याचे चित्र आहे. कोल्हापुरातील काही जुन्या व निष्ठावान कार्यकर्त्यांना उमेदवारीचे तिकीट नाकारण्यात आल्याने ते राजीनाम्याच्या तयारीत आज संध्याकाळी आयसोलेशन हॉस्पिटल जवळ एकत्र जमले होते. या बैठकीत सविस्तर चर्चा होऊन राजीनामा देण्याचा निर्णयही निश्चित करण्यात आला होता. मात्र ही बाब भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या कानावर जाताच संबंधित कार्यकर्त्यांना तातडीने फोन करून चर्चेसाठी बोलावण्यात आले. या बैठकीला काही कार्यकर्ते उपस्थित राहण्यासाठी गेले, तर काहींनी तटस्थ भूमिका घेत जाणे टाळले. तटस्थ राहिलेल्या काही कार्यकर्त्यांनी थेट अपक्ष निवडणूक लढवण्याचा पवित्रा घेतला, तर काहींनी पुढील निर्णय लवकरच जाहीर करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे भाजपसमोरील संघटनात्मक अडचणी आणखी वाढताना दिसत आहेत.
दरम्यान, भाजपचे नेते व माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अलीकडेच भाजपच्या जुन्या व निष्ठावान कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याची भावना सार्वजनिकरित्या व्यक्त केली होती. त्यांच्या या वक्तव्याचे पडसाद आज कोल्हापुरात उमटताना दिसत असून, अनेक वर्षे पक्षासाठी झटलेले आणि संघटना मजबूत करण्यासाठी काम केलेले कार्यकर्ते आता राजीनाम्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट होत आहे.