साकोलीत उमेदवारांसमोर ‘शून्य भ्रष्टाचार’ शपथपत्राची अट; राजकारणात खळबळ
साकोली : नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात नागरिकांनीच पुढाकार घेत स्टॅम्प पेपरवरील भ्रष्टाचारविरोधी शपथपत्र करारनामा तयार केला आहे. उमेदवारांनी निवडून आल्यानंतर कोणतेही टेंडर, कंत्राट, कमिशनखोरी, गैरव्यवहार करणार नाहीत, निधी पारदर्शकपणे वापरतील आणि उल्लंघन केल्यास तात्काळ राजीनामा व गुन्हा दाखल होण्याची जबाबदारी स्वीकारतील, अशी कडक अट यात ठेवण्यात आली आहे. या उपक्रमाने अनेक उमेदवारांची धांदल उडाली असून करारनामा नागपूर, पुणे, नाशिकपर्यंत व्हायरल झाला आहे. युवक, महिला व ज्येष्ठ नागरिक उमेदवारांना प्रत्यक्ष भेटून शपथपत्रावर स्वाक्षरीची मागणी करत आहेत. साकोली-सेंदूरवाफामधील ही जनचळवळ लोकशाहीतील पारदर्शकतेचा नवा अध्याय ठरत असून नागरिकांचा “विकास हवा, भ्रष्टाचार नको; आणि त्यासाठी लिखित हमीच हवी!” असा स्पष्ट संदेश आहे.