बोगस दिव्यांग प्रमाणपत्र रॅकेटमधील दोषींवर कारवाई करा, अन्यथा...
संजय पवार यांचा इशारा
कोल्हापूर - छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयात गेली अनेक वर्षे बोगस दिव्यांग दाखले देणारे एक रॅकेट कार्यरत आहे. नुकत्याच प्राप्त झालेल्या एका चौकशी अहवालात एका रुग्णावर छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात हृदय शस्त्रक्रिया झाली असल्याचे नमूद करण्यात आले आहे. मात्र नंतर प्रशासनाने दिलेल्या माहितीत हृदयशस्त्रक्रिया झाली नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. शिक्षक भरतीसारख्या शासकीय नोकर भरतीसाठीही सीपीआर मधून बोगस दिव्यांग दाखले दिल्याची माहिती चौकशी अहवालातून समोर आली आहे. राज्याचे आरोग्य खाते सांभाळणाऱ्या आरोग्य मंत्र्यांच्या जिल्ह्यात अशाप्रकारे शासकीय रुग्णालयात बोगस दिव्यांग दाखल्यांचा महाघोटाळा सुरु असल्याचा आरोप शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते संजय पवार यांनी केलाय.
सीपीआर मधील एक आणि जिल्हा परिषदेचा एक कर्मचारी या महाघोटाळ्यात सहभागी असून हॉटेल मधल्या मेनू कार्ड सारखे सीपीआर मधील बोगस दिव्यांग दाखले देण्यासाठी एक रेट कार्ड असल्याचा, आरोप संजय पवार यांनी केला आहे.
आरोग्य मंत्री प्रकाश आबीटकर आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी, याची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित वरिष्ठ अधिकारी, डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांना सेवेतून बडतर्फ करावे, अन्यथा रस्त्यावरच्या लढाई बरोबर न्यायालयीन लढाई देखील लढू, असा इशारा पवार यांनी यावेळी दिलाय. सीपीआर मधील एका शिपायाच्या दारात दोन जेसीबी आहेत असे सांगत लवकरच रॅकेट मध्ये सहभागी सीपीआर आणि जिल्हा परिषदेमधील कर्मचाऱ्यांची नावे कागदोपत्री पुराव्यासह जाहीर करू असेही पवार यांनी सांगितले आहे.
या पत्रकार बैठकीला उपजिल्हाप्रमुख अवधूत साळोखे, करवीर तालुकाप्रमुख विराज पाटील, युवा सेना जिल्हाप्रमुख मंजित माने, उपशहर प्रमुख संतोष रेडेकर, संजय जाधव आदी उपस्थित होते.