आता मित्रपक्षाच्याच आमदाराने टराटरा कपडे फाडल्याने...
आ. रोहित पवारांचा आ. राणेंच्या आरोपावरून भाजपवर हल्लाबोल
मुंबई - मालवणमध्ये भाजप कार्यकर्त्यांच्या घरी 25 लाख रुपयांची रोकड सापडली आहे. त्यांच्या घरी हे पैसे काय करतात, हे सगळं निवडणूक यंत्रणेला सांगावे लागेल, असे आ. निलेश राणे म्हणाले. काल भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण मालवणमध्ये येऊन गेले, तेव्हापासूनच वेगाने पैसे वाटपाची पद्धत सुरू झाली आहे असा गंभीर आरोप शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर केला आहे. यावर आ. रोहित पवार यांनी आमदार निलेश राणे यांचे अभिनंदन केले आहे.
आ.रोहित पवार यांनी म्हटले आहे कि, निवडणुका जिंकण्यासाठी वारेमाप पैशाचा वापर करणाऱ्या भाजपाचा खरा चेहरा पुराव्यासह उघड केल्याबद्दल शिवसेना नेते आमदार निलेश राणे यांचे मनापासून आभार! सत्तेत असताना मलिदा खायचा आणि नंतर त्याचाच वापर करुन निवडणुका जिंकायच्या हाच भाजपच्या विजयाचा ‘फॉर्म्युला’ आहे. यात कोणतीही चाणक्य नीती नाही. आता मित्रपक्षाच्याच आमदाराने टराटरा कपडे फाडल्याने ‘पार्टी विथ डिफरन्स’ असे नाकाने कांदे सोलण्याचे धंदे भाजपाने बंद करावेत आणि आपले पाय मातीतच नाही तर चिखलात पूर्ण माखलेले आहेत, हे मान्य करावं, असा हल्लाबोल त्यांनी केला आहे.