कोल्हापूर महापालिकेच्या प्रारुप मतदार यादीतील घोळा विरोधात स्वाक्षरी मोहिम...

<p>कोल्हापूर महापालिकेच्या प्रारुप मतदार यादीतील घोळा विरोधात स्वाक्षरी मोहिम...</p>

कोल्हापूर - संविधान दिनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरातील क्रांतिसिंह नाना पाटीलनगर चौकात नागरिकांनी महापालिकेच्या प्रारुप मतदार यादीतील गोंधळा विरोधात स्वाक्षरी मोहीम राबवली. या मोहीमेत मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी सह्या करून मतदार यादीतील त्रुटींवर आक्षेप नोंदवला.

यावेळी गजानन विभूते यांनी, प्रभाग २० मधील मतदार यादीतला गोंधळ दाखवत नागरिकांनी मोहिमेत सामील व्हावे, असे आवाहन केले. कुटुंबातील सदस्यांची नावं क्रमाने असावीत, नव्याने तयार केलेल्या प्रभागांनुसार याद्यांचे पुनर्संकलन करावे, केंद्रनिहाय यादी करताना सर्व्हे नंबर किंवा कॉलनीनुसार मतदान होईल, याची काळजी घ्यावी, नवीन, अद्ययावत मतदारयाद्या तयार करणे बंधनकारक व्हावे, अशा मागण्या गजानन विभूते यांनी केल्या आहेत.

कॉम्रेड अनिल चव्हाण यांनी, मतदार यादीतील गंभीर त्रुटींबाबत निवडणूक आयोगावर टीका केली. बालवाडीपासून महाविद्यालयांपर्यंत विद्यार्थ्यांची नोंद आठ दिवसांत व्यवस्थित केली जाते, मग संगणकाच्या युगात मतदारयादी इतकी अव्यवस्थित का ?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. भारतीय संविधानाने दिलेले लोकशाही हक्क जपले नाहीत, तर पुन्हा गुलामगिरी येऊ शकते. म्हणून लोकशाही हक्कांबाबत जागरूक रहा, असे आवाहन कॉम्रेड चंद्रकांत यादव यांनी केले आहे.

 या स्वाक्षरी मोहिमेत आनंदराव चौगुले, बी. एल. बर्गे, सुभाष शेटे, चंद्रकांत बागडी, युवराज मोळे, प्रकाश जोशी, के. एच. झोरे, सुधाकर साळोखे, शोभा विभुते, संगीता खराडे, वंदना साळसकर, वासंती विभुते यांच्यासह नागरिकांनी सहभाग घेतला.