महानगरपालिका निवडणुका २०२५ : मतदार याद्यांतील चुका ‘सुओ-मोटो’ दुरुस्त करण्याचे आयुक्तांना आदेश

<p>महानगरपालिका निवडणुका २०२५ : मतदार याद्यांतील चुका ‘सुओ-मोटो’ दुरुस्त करण्याचे आयुक्तांना आदेश</p>

मुंबई : राज्य निवडणूक आयोगाने महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर मतदार यादींच्या अचूकतेबाबत महत्त्वाचे निर्देश जारी केले आहेत. अनेक महानगरपालिकांकडून चुकीच्या प्रभागात मतदारांची नावे समाविष्ट झाल्याच्या तक्रारी येत असल्याने आयुक्तांनी स्वतःहून (Suo-moto) दुरुस्ती करण्याचे स्पष्ट आदेश आयोगाने दिले आहेत.

राज्य निवडणूक आयोगाने जुलै आणि ऑक्टोबर २०२५ मध्ये जारी केलेल्या आदेशांमध्ये मतदार यादी तयार करणे, तसेच संभाव्य दुबार मतदारांबाबत उपाययोजना सूचित केल्या होत्या. मात्र, त्यावर अधिक स्पष्टता आणत आयोगाने आज काढलेल्या परिपत्रकाद्वारे महापालिका आयुक्तांवर जबाबदारी अधोरेखित केली आहे.

आयोगाने सांगितले की विधानसभा मतदार यादीचे संबंधित प्रभागात अचूक विभाजन करणे ही महापालिका आयुक्तांची प्राथमिक जबाबदारी आहे. प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर लेखनिक त्रुटी, चुकीच्या प्रभागात नावांचा समावेश किंवा १ जुलै २०२५ च्या विधानसभा मतदार यादीत नाव असूनही प्रभागात समावेश न होणे अशा त्रुटी आढळल्यास त्या कोणत्याही हरकतीची वाट न पाहता स्वतःहून दुरुस्त करणे आवश्यक आहे.

काही महानगरपालिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर मतदार नावे चुकीच्या प्रभागात गेल्याची नोंद आयोगाकडे आली आहे. त्यामुळे प्राप्त तक्रारींची त्वरित तपासणी करून संबंधित मतदार योग्य प्रभागात समाविष्ट करावेत, असे निर्देश देण्यात आले आहेत. या प्रक्रियेत केवळ बी.एल.ओ. यांच्या अहवालावर विसंबून न राहता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पडताळणी करावी, असेही आयोगाने स्पष्ट केले आहे.

हरकतींचा निपटारा रोजच्या रोज करून शेवटच्या दिवशी ताण वाढू नये याची दक्षता घ्यावी, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

हे निर्देश मा. राज्य निवडणूक आयुक्त यांच्या आदेशाने जारी करण्यात आले आहेत.