प्रारूप मतदार यादीतील तक्रारींवर प्रत्यक्ष स्थळपाहणीचे प्रशासक मंजूलक्ष्मी यांचे निर्देश
कोल्हापूर : महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीवर विविध पक्ष व संघटनांकडून मोठ्या प्रमाणात हरकती प्राप्त झाल्यानंतर, प्रत्येक तक्रारीची प्रत्यक्ष जागेवर जाऊन तपासणी करण्याचे निर्देश प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना दिले. आयुक्त कार्यालयात आयोजित संयुक्त बैठकीत सर्व प्रभाग क्षेत्र अधिकारी आणि उप-शहर अभियंते उपस्थित होते.
प्रारूप यादीत आढळलेल्या त्रुटींवर तातडीने कार्यवाही करून प्राप्त झालेल्या सर्व हरकतींचे शंभर टक्के निराकरण करावे, असे त्यांनी स्पष्ट केले. अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करताना कोणतीही चूक राहू नये यासाठी पूर्ण दक्षता घ्यावी, तसेच कामात हलगर्जीपणा आढळल्यास संबंधित प्रभाग अधिकारी आणि इतर जबाबदार कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देखील त्यांनी दिला.
तपासणी प्रक्रियेला गती देण्यासाठी प्राधिकृत अधिकाऱ्यांना महापालिकेतील कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांची मदत घेण्याची मुभा देण्यात आली आहे. त्याचबरोबर मिटर रीडर, घरफाळा विभागातील कर्मचारी, आरोग्य निरीक्षक आणि मुकादम यांची बी.एल.ओ.ना सहाय्य करण्यासाठी विभागनिहाय अतिरिक्त नेमणूक करण्यात आली आहे.
दरम्यान, आज छत्रपती शाहू सभागृहात बी.एल.ओ., पर्यवेक्षक, मिटर रीडर, घरफाळा विभागातील कर्मचारी, आरोग्य निरीक्षक व मुकादम यांची विभागनिहाय बैठक घेण्यात आली. यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनी सर्व हरकतींची प्रत्यक्ष स्थळपाहणी करून कोणतीही तक्रार प्रलंबित ठेवू नये, असे स्पष्ट निर्देश दिले. कामकाजात अडचणी आल्यास सहायक आयुक्त किंवा उप-शहर अभियंत्यांशी समन्वय साधून त्वरित निराकरण करण्याचेही त्यांनी सांगितले.
प्रारूप मतदार यादीतील सर्व तक्रारींचे पूर्ण निराकरण करण्यासाठी सुमारे ९०० महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांची मोठी फौज कामाला लागली असून, निवडणूक प्रक्रियेत अचूकता आणि पारदर्शकता राहावी यासाठी व्यापक उपक्रम राबविण्यात येत आहेत.