कट्टर विरोधक एकत्र; जनता स्वीकारणार का? कागलच्या राजकारणात नवे समीकरण

<p>कट्टर विरोधक एकत्र; जनता स्वीकारणार का? कागलच्या राजकारणात नवे समीकरण</p>

कोल्हापूर  – कागल नगरपालिका निवडणुकीत दशकांपासून एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक मानले जाणारे मंत्री हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे अचानक एकत्र आल्याने कागलच्या जनतेत आश्चर्य, धक्का आणि अविश्वास अशा मिश्र भावना उमटल्या आहेत. “कट्टर विरोधक हातात हात घालून चालू लागले, पण हे समीकरण जनता पसंद करणार का?” हा प्रश्न आता कागलमध्ये सर्वाधिक चर्चेत आहे.

मुश्रीफ–घाटगे यांची युती सत्ता आणि स्वार्थाचा गणिती निर्णय असल्याची टीका होत असताना, दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते नव्या स्थितीत गोंधळलेले दिसत आहेत. कालपर्यंत एकमेकांवर आरोप करणारे दोन गट आज एकाच मंचावर उभे राहिल्याने मतदारांमध्येही संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

➡️जनता म्हणते – “राजकारणी बदलतात, आम्ही का नाही”...
“जी दोन कुटुंबे पिढ्यान्‌पिढ्या लढली, त्यांची अचानक झालेले मिठ्ठी जनता कशी पचवेल?” असा सवाल करत कागलमध्ये अनेक नागरिकांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. “आम्ही ज्यांच्यासाठी भांडलो, पोस्टर लावले, सोशल मीडियावर वाद घातले, तेच आज एकत्र. मग आम्ही का विश्वास ठेवावा?” असाही सूर जनतेतून व्यक्त होताना दिसत आहे. युतीमागील राजकीय सौदेबाजीची चर्चा वाढत असताना, जनतेकडून या नव्या समीकरणाला सहज पाठिंबा मिळेल असे दिसत नाही, असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे.

कार्यकर्त्यांमध्ये नाराजी, विश्वासाचा तिढा वाढतोय. दोन्ही पक्षांचे तळागाळातील कार्यकर्ते “आम्हाला सांगितलं नव्हतं” म्हणत नाराज झाले आहेत. काहींचे एबी फॉर्म परत घेतल्याने भाजपातील कार्यकर्ते नाराज झाले आहेत. सोशल मीडियावर समर्थकांमध्ये मोठा संभ्रम: “कालचे शत्रू आजचे मित्र?” काही कार्यकर्त्यांनी तर “जर नेता कधीही शत्रूला मित्र करू शकतो, तर कार्यकर्त्यांनी कोणासाठी लढायचं?” असा थेट प्रश्न उपस्थित केला जातोय.

➡️राजकीय समीकरणाचा परिणाम मतदानावर होणार?..
सत्तेची समीकरणे बदलली, पण जनतेची मने बदलतील का, हा खरा प्रश्न आहे. पुढील नगरपालिका, जिल्हा परिषद व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये मतदारांची प्रतिक्रिया युतीची खरी परीक्षा घेणार आहे. “ही तात्कालिक सोयरीक आहे, जनतेचा विश्वास मिळवण्यासाठी वेळ लागेल”, “कट्टर विरोधक अचानक एकत्र आले की जनतेत उलट प्रतिक्रिया येते”,“सत्ता समीकरणे बदलली, पण भावनिक राजकारण सोपे नसते”, एकत्र येणे कौतुकास्पद की सत्तेसाठी सोयरीक? असे जिल्ह्यातील काही जाणकारांना पडलेले प्रश्न आहेत.

मुश्रीफ आणि घाटगे या दोघांनीही विकास, सहयोग आणि स्थिरतेसाठी निर्णय घेतल्याचा दावा केला असला, तरी विरोधकांनी हा निर्णय “फक्त सत्तेची सोयरीक” असल्याची टीका केली आहे.

 “सामंजस्य ठीक, पण अचानक ‘कट्टर’ पासून ‘सहकारी’ हा बदल जनतेला पचनी पडत नाही.” असे अनेकांचे स्पष्ट मत आहे. कागलच्या राजकारणात गेल्या अनेक वर्षांत न पाहिलेले समीकरण आता तयार झाले आहे. परंतु या नव्या युतीला जनतेची मान्यता मिळते का, की मतदार “हातमिळवणीवर संशय” व्यक्त करतात, हे आगामी निवडणुकांत स्पष्ट होणार आहे.