निवडणुकांमध्ये राजकीय टक्करीसाठी सज्ज : आ. सतेज पाटील
कोल्हापूर – आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राजकीय टक्कर देण्यासाठी सज्ज असल्याचे वक्तव्य आ. सतेज पाटील यांनी केले आहे. सागरमाळ येथे उभारलेल्या रेड्याची टक्कर स्मृती शिल्पाचे अनावरण आ. सतेज पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.
यावेळी आमदार सतेज पाटील यांनी, कोल्हापूरला ऐतिहासिक वारसा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून ते राजर्षी शाहू महाराजांचा पुतळा आणि शहरातील इतरही महापुरुषाचे पुतळे प्रेरणा देणारे आहेत. सागरमाळ येथील रेड्याची टक्करीलाही ऐतिहासिक वारसा लाभला असल्याचं संगितलं. नव्या पिढीला हा इतिहास माहीत व्हावा यासाठी हे शिल्प उभारले आहे. शाहूनगर येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी २० लाख तर रेड्याच्या शिल्पा भोवती सीसीटीव्ही कॅमेरे आणि लाईटिंगसाठी ५ लाख रुपये निधी देण्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.
माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी, कोल्हापूर शहरातील अशी अनेक ठिकाणं आहेत, जी शाहू कालीन परंपरेची आजही ओळख करून देणारी आहेत. शाहू महाराजांच्या काळात पुढे आलेली रेड्याची टक्कर ही संकल्पना, आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा सोनेरी इतिहास पुढच्या पिढ्यांनाही कळावा यासाठी हे शिल्प उभारले असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी माजी आमदार जयश्री जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी माजी उपमहापौर भूपाल शेटे, माजी नगरसेवक राजेश लाटकर, माजी नगरसेवक खंडू कांबळे, शिवाजी कवाळे, जयश्री जाधव, काकासाहेब पाटील, प्रवीण केसरकर, प्रतिज्ञा उत्तुरे, राजू साबळे, सुरेश धोणूक्षे, उमेश पवार, सर्जेराव साळुंखे, समीर कुलकर्णी, अनिल घाटगे, स्वप्निल रजपूत, संदीप पाटील, रवींद्र नलवडे, यांच्यासह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.