‘तुम्ही जे करताय, ते योग्य नाही’ : पक्षप्रवेशावरून महायुतीत खटके
मुंबई – पक्ष प्रवेशावरून भाजप आणि शिंदे गटामध्ये खटके उडायला सुरुवात झाली आहे. शिंदे गटाच्या काही कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने शिंदे गटाच्या नेत्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे. ही नाराजी आजच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत प्रकर्षाने दिसून आली.
आजच्या कॅबिनेट बैठकीवर शिंदे गटाच्या मंत्र्यांनी बहिष्कार टाकला. ही बैठक संपताच शिंदे गटाच्या सर्व मंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी ‘तुम्ही जे करताय, ते योग्य नाही, असं शिवसेनेचे मंत्री देवेंद्र फडणवीसांना म्हणाले. तसेच कल्याण-डोंबिवलीतल्या ऑपरेशन लोटसवरुन देवेंद्र फडणवीसांकडे तक्रार देखील केली. यावर ‘तुम्ही जे करता ते चालतं आणि आम्ही केलं कि त्रास होतो’ असे मुख्यमंत्र्यांनी प्रत्युत्तर दिल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तोंडावर उडत असलेल्या खटक्यांचा परिणाम महायुतीला भोगावा लागणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.