‘मी सर्वांची माफी मागतो’ : मंत्री हसन मुश्रीफांचं अनपेक्षित युतीबाबत स्पष्टीकरण...
कोल्हापूर - कागल नगरपालिका निवडणुकीसाठी समरजीतसिंह घाटगे आणि मंत्री हसन मुश्रीफ एकत्र येणार असल्याची चर्चा सुरु असतानाच मंत्री हसन मुश्रीफ यांनी, कागल नगरपालिकेत राष्ट्रवादी आणि छत्रपती शाहू आघाडीची अनपेक्षित युती”, झाल्याचे स्पष्टीकरण प्रसिद्धी पत्राव्दारे दिले आहे. त्यामुळे कागल नगरपालिका निवडणुकीमध्ये नवा ट्विस्ट आला आहे.
मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकात म्हटले आहे कि, आज राष्ट्रवादी व छत्रपती शाहू आघाडी- कागल यांची कागल नगरपरिषदेमध्ये आघाडी झाली. ही घटना इतकी अनपेक्षितपणे घडली की, प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्याशी सल्लामसलत करता आली नाही. याबाबत मी या सर्वांची माफी मागतो.
तसेच माझे ज्येष्ठ मित्र माजी आमदार संजयबाबा घाटगे व त्यांच्या प्रमुख कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता हा निर्णय घ्यावा लागला. त्याबद्दल त्यांची व त्यांच्या कार्यकर्त्यांची दिलगिरी व्यक्त करतो. या आघाडीमुळे त्यांचा आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा विश्वासघात होणार नाही. आपल्या झालेल्या चर्चेपासून मी ढळणार नाही. उलट; शिर्षस्थ नेतृत्वाबरोबर बसून त्यांच्या कार्यकर्त्यांना जादा दिलासा कसा मिळेल, याबाबत मी प्रयत्न करीन. माझ्या व संजयबाबांच्या चर्चेमधून गैरसमज पण दूर होईल, याची मला खात्री आहे.
सदर आघाडी ही कागल शहराच्या व तालुक्याच्या विकासासाठी व विनाकारण सुरू असलेला संघर्ष थांबवण्यासाठी व जनतेला भरभरून कसे देता येईल, यासाठी झालेली आहे. यामध्ये कोणताही दुसरा हेतू नाही. याबाबत मंगळवार १८ रोजी चार वाजता मटकरी हॉलमध्ये मी व समरजीतसिंह घाटगे अशी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन आमची भूमिका आणि पुढील दिशा स्पष्ट करणार आहोत.