कोल्हापूर महानगरपालिकेला ‘वाली’ नाही! — शहर विकासाची स्वप्नं आजही अधांतरी
 

अडीच हजार कोटींचा निधी गेला कुठे? — माजी नगरसेविका भारती पोवार यांचा सवाल

<p>कोल्हापूर महानगरपालिकेला ‘वाली’ नाही! — शहर विकासाची स्वप्नं आजही अधांतरी<br />
 </p>

कोल्हापूर - एकेकाळी स्वच्छ, सांस्कृतिक आणि समृद्ध म्हणून ओळखले जाणारे कोल्हापूर आज प्रशासनिक गोंधळ, अपूर्ण प्रकल्प आणि राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या भोवऱ्यात अडकले आहे. गेल्या पाच वर्षांपासून महापालिकेत लोकप्रतिनिधी नाहीत, सर्व सत्ता प्रशासकांच्या हाती असून, आता प्रशासन आणि लोकप्रतिनिधी हेच एकमेकांना जबाबदार ठरवत आहेत. रस्त्यांसाठी १०८ कोटी, अंबाबाई मंदिर विकासासाठी १४०० कोटी, रंकाळा तलावासाठी ८ कोटी, गांधी मैदानासाठी ५ कोटी, नव्या प्रकल्पांसाठी ४८० कोटी  असा तब्बल अडीच हजार कोटी रुपयांचा निधी जाहीर झाला. पण तो गेला कुठे? प्रशासनाच्या खिशात की लोकप्रतिनिधींच्या?” असा थेट सवाल माजी नगरसेविका भारती पोवार यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.

➡️“तू कर हसल्यासारखं, आणि मी करतो रडल्यासारखं!”...
पवार म्हणाल्या, “अलीकडील एका बैठकीत शहराचे आमदार, पालकमंत्री आणि दक्षिणचे आमदार यांनी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना झापलं. महिला आयुक्तांना खाली मान घालून बसावं लागलं. तरीही ना प्रशासन बदललं, ना लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतला. ही परिस्थिती म्हणजे ‘तू कर हसल्यासारखं, आणि मी करतो रडल्यासारखं!’ अशीच आहे.”

➡️घोषणा हजारो कोटींच्या, पण प्रत्यक्षात काम शून्य...
पवार यांनी पुढे सांगितले की, गेल्या काही वर्षांत कोल्हापूरसाठी हजारो कोटींच्या निधीच्या घोषणा झाल्या, मात्र प्रत्यक्षात काम शून्य आहे. “जर पैसे प्रत्यक्षात आले नसतील, तर प्रशासनाने स्पष्ट सांगावं. जनतेला फसवणूक नको, उत्तर हवं,” अशी मागणी त्यांनी केली.

➡️‘बास्केट ब्रिज’ की ‘बास्केटब्रिजचा खेळ’?....
“दहा वर्षांपासून ऐतिहासिक बास्केट ब्रिजच्या कामाची चर्चा सुरू आहे. पण आजही आराखडा तयार झालेला नाही. दरम्यान, चार कोटींच्या कमानीचे काम सुरू होणार आहे. मग आधी ब्रिजचा मार्ग ठरवून मगच कमान बांधावी; अन्यथा पुन्हा कोटी रुपये वाया जातील आणि शहराची नाचक्की होईल,” असा इशाराही त्यांनी दिला.

➡️कोल्हापूर एकेकाळी झळकणारं, आज दुर्दशेचं शहर...
रस्त्यांची दुरवस्था, कचऱ्याचे ढीग, कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती आणि अधिकाऱ्यांचे जनतेकडं दुर्लक्ष — ही कोल्हापूरची आजची वस्तुस्थिती असल्याचे पवार यांनी सांगितले. “सामान्य नागरिकांचे प्रश्न अनुत्तरीत आहेत, पण बिल्डर आणि ठेकेदारांचे प्रस्ताव मात्र झपाट्याने मंजूर होतात,” असा आरोपही त्यांनी केला.

➡️पाणी, ड्रेनेज आणि भ्रष्टाचाराचे प्रश्न कायम...
पवार म्हणाल्या, “चंबुखडीपर्यंत पाईपलाईन नेली, पण शहरातील घरांपर्यंत पाणी पोहोचत नाही. ड्रेनेज लाईनसाठी २५० कोटी मंजूर झाले, पण काम कुठेच दिसत नाही. ठेकेदार ब्लॅकलिस्ट झाले, पण त्यामागचं कारण आजही गूढ आहे.” तसेच, कॉंग्रेसचे आमदार सतेज पाटील यांना मुद्दाम बदनाम करण्याचे काम काही लोकप्रतिनिधी आणि प्रशासक करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

➡️“कोल्हापूरच्या नागरिकांना फसवणूक नको, उत्तर हवं”...
“घोषणा झालेला सुमारे अडीच हजार कोटी रुपयांचा पैसा गेला कुठे, याचा हिशोब द्या. कोल्हापूरच्या नागरिकांना आता फसवणूक नको — आम्हाला उत्तर हवं!” अशी मागणी पवार यांनी यावेळी केली.