फलटण महिला डॉक्टर प्रकरणी कोणतीही विशेष समिती नेमली नसल्याचा सुषमा अंधारेंचा गंभीर आरोप
सातारा - फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्याप्रकरणी चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने विशेष तपास समिती नेमल्याची माहिती खोटी असल्याचे वक्तव्य ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केले आहे. त्यांनी आज फलटण पोलीस ठाण्याला भेट दिली यावेळी त्यांनी पोलीस ठाण्यासमोर निदर्शनेही केली.
राज्य सरकारने या प्रकरणात केवळ देखरेख करण्यासाठी आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते यांची नेमणूक केली असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. मला रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याबाबत कोणताही वैयक्तिक आकस नाही. ते आज संध्याकाळी सभा घेऊन उत्तर देणार आहेत. पण त्याऐवजी त्यांनी माझ्यासोबत पोलीस ठाण्यात येऊन आरोपपत्र दाखल करण्यास मदत करावी. मी तुमची बहीण आहे, तुमच्या गावची पाहुणी आहे. तुमच्या सभ्यपणावर माझा विश्वास आहे, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले. आम्ही त्यासाठी न्यायालयात रिट याचिका दाखल करणार आहोत. या प्रकरणाची चौकशी निवृत्त न्यायमूर्तींच्या माध्यमातून करावी. जेणेकरुन या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप होणार नाही, असेही सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे.