विकासासाठी नगरसेवक महत्त्वाचे: काँग्रेसला साथ द्या, भ्रष्टाचार टाळा – आमदार सतेज पाटील यांचे फुलेवाडीतील कार्यक्रमात आवाहन
कोल्हापूर : फुलेवाडी येथे माजी नगरसेवक राहुल माने यांच्या स्वखर्चातून करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज उद्यान सुशोभीकरण व विद्युत पथदिवे कामांचे उद्घाटन रविवारी करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन खासदार शाहू महाराज छत्रपती आणि विधानपरिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून झाली.
यावेळी आमदार सतेज पाटील म्हणाले, राहुल माने यांनी स्वखर्चातून विकासकामे करून नागरिकांसाठी आदर्श निर्माण केला आहे. गायरान जमीन आणि कमानीचा प्रश्न त्यांनी सोडवला आहे. सध्याचे सरकार चुकीच्या पद्धतीने काम करत आहे. महापालिका चांगल्यांच्या हातात जावी, लुटारूंच्या हातात जाऊ नये. भ्रष्टाचारी लोक मत मागायला येतील, त्यामुळे नागरिकांनी जागरूक राहावे, असे आवाहन केले. तसेच शहर विकासासाठी सक्षम नगरसेवक असणे अत्यावश्यक आहे. मागील दहा वर्षांपासून महापालिकेच्या निवडणुका झालेल्या नाहीत. नागरिकांनी आपले प्रतिनिधी ठरवले, तर शहराचा विकास वेगाने होईल, असेही त्यांनी सांगितले.
खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी राहुल माने यांच्या कामाचे कौतुक केले. निवडणुका वेळेवर न झाल्यामुळे विकास खुंटला आहे. शहरातील रस्त्यांची अवस्था खड्ड्यांत रस्ते अशी झाली आहे. खऱ्या अर्थाने स्वराज्य आणायचे असेल, तर चांगले नगरसेवक निवडा. काँग्रेसला साथ दिल्यास रखडलेली कामे पूर्ण होतील, असे ते म्हणाले.
राजू लाटकर यांनी राज्यातील मोदी-फडणवीस-महायुती सरकारवर टीका करत “कोल्हापुरात या सरकारनं राहुल मानेसारखं एकतरी काम केलं आहे का?” असा सवाल केला. लोकांच्या हितासाठी काम करणारे आमदार सतेज पाटील हे नेतृत्व आहे. सरकारने सर्व गोष्टींची वाट लावली आहे. महापालिकेतील दिवेही अमित शहा यांच्या कॉन्ट्रॅक्टरकडून खरेदी केले जातात. मग हे कसलं रामराज्य? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. राज्यात सध्या सुरळीत कामकाज नसल्याचं, सगळा कारभार अंधाधुंद सुरू असल्याची टीका केली.
कार्यक्रमास नागोजीराव पाटील, जयसिंगराव माने, शामराव माने, निवास पाटील, ऍडव्होकेट अजित मोहिते, इंद्रजीत बोंद्रे, प्रताप जाधव, अतुल बोंद्रे, नंदकुमार सूर्यवंशी, राजू पाटील, विनायक फाळके, रियाज सुभेदार, लाला भोसले, तौफिक मुल्लाणी, अमर पाटील, विजय दिवसे, राजू अपराध, नामदेव लवटे यांच्यासह स्थानिक नागरिक, काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.