परीखपुल परिसरातील स्थितीबाबत नागरिकांचा अनुभव – रेल्वे प्रशासन, महापालिका आणि लोकप्रतिनिधींची उदासीनता

<p>परीखपुल परिसरातील स्थितीबाबत नागरिकांचा अनुभव – रेल्वे प्रशासन, महापालिका आणि लोकप्रतिनिधींची उदासीनता</p>

कोल्हापूर : कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानकावरून राजारामपुरीकडे जाणाऱ्या मार्गावर असलेला परीखपूल हा परिसर अनेक वर्षांपासून पावसाळ्यात पाण्याखाली जातो. आज पुन्हा एकदा अचानक आलेल्या अवकाळी पावसाने याच परिस्थितीची पुनरावृत्ती केली. केवळ दहा मिनिटांच्या पावसात परीखपुलाच्या खालील भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आणि नागरिकांना तसेच वाहनचालकांना त्रास झाला. पादचारी उड्डाणपूल नसल्यामुळे नागरिकांना परीखपुलाच्या खालील भागातूनच जाणं भाग पडतं. त्यामुळे काही मिनिटांच्या पावसातच हा भाग धोकादायक बनतो. पाऊस थांबल्यानंतर पाणी ओसरतं, परंतु त्या काळात नागरिकांची प्रचंड गैरसोय होते.

पादचाऱ्यांची ‘तारेवरची कसरत’ ....
गेल्या सहा वर्षांपासून परीखपुलाच्या नुतनीकरणासाठी आणि पर्यायी व्यवस्था करण्यासाठी स्थानिक नागरिक सातत्याने प्रयत्न करत आहेत. परीखपूल नुतनीकरण समितीचे फिरोझ शेख यांनी सांगितलं की, रेल्वे प्रशासन, महापालिका आणि लोकप्रतिनिधी यांच्या उदासीनतेमुळे आजही या भागात कोणताही बदल झालेला नाही. अनेक आंदोलने, निवेदने देऊनही प्रशासनाने या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याचं त्यांनी सांगितलं. आजच्या पावसात पुन्हा एकदा परीखपुलाखालील रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेला. “महापालिकेचे अधिकारी अकार्यक्षम असून नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत त्यांना काहीही भान नाही,” अशी तीव्र टीका शेख यांनी केलीय. या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन पादचारी उड्डाणपूल, तसेच पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी परीखपूल नुतनीकरण समितीने केली आहे.