दौलत साखर कारखाना राज्यात नंबर वन बनवू – चेअरमन मानसिंग खोराटे

<p>दौलत साखर कारखाना राज्यात नंबर वन बनवू – चेअरमन मानसिंग खोराटे</p>

चंदगड – “दौलत साखर कारखाना राज्यात नंबर वन बनवू. हा कारखाना सभासदांचाच राहील आणि गतवैभव पुन्हा प्राप्त करून सभासदांच्या हाती सोपवू,” अशी ग्वाही अथर्व-दौलत साखर कारखान्याचे चेअरमन मानसिंग खोराटे यांनी दिली. कामगारांनी दिशाहीन न होता आपल्या हक्कासाठी योग्य मार्गाने भांडावे. त्यांच्या घामाची एक पैदेखील थकवली जाणार नाही,” असेही ते म्हणाले. चंदगड तालुक्यातील हलकर्णी येथे अथर्व-दौलत साखर कारखान्याच्या विस्तार व को-जन (Co-gen) प्रकल्पाच्या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला आमदार शिवाजीराव पाटील आणि माजी राज्यमंत्री भरमूअण्णा पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

या वेळी आमदार शिवाजीराव पाटील म्हणाले, “शेतकरी आणि कामगारांचे हित जोपासणे ही अथर्व प्रशासनाची जबाबदारी आहे. दौलत ही आमची मुलगी आहे, ती अथर्व प्रशासनाने व्यवस्थित सांभाळावी. शेतकऱ्यांच्या घामातून हा कारखाना उभा राहिला असून त्यांच्या प्रश्नांवर आम्ही कायम मदतीस तयार आहोत.”

माजी राज्यमंत्री भरमूअण्णा पाटील म्हणाले, “या कारखान्यासाठी आमचं रक्त सांडलं आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही कायम सोबत राहू.”

कार्यक्रमाला मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मराठे, एचआर अश्रू लाड, गिरीजादेवी शिंदे, विजय पाटील, दयानंद देवण, शांताराम पाटील, लक्ष्मण गावडे, नामदेव पाटील, सचिन बल्लाळ, रवी बांदिवडेकर, भावकू गुरव, यशवंत सोनार, बसवराज आरबोळे आदी मान्यवर उपस्थित होते.