पोलीस स्मृती दिनानिमित्त शहीद जवानांना आदरांजली

<p>पोलीस स्मृती दिनानिमित्त शहीद जवानांना आदरांजली</p>

कोल्हापूर – "पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांनी कर्तव्य बजावत असताना स्वतःच्या आरोग्याकडेही लक्ष देणे आवश्यक आहे. आपण तंदुरुस्त असलो तरच आपली जबाबदारी अधिक चांगल्या प्रकारे पार पाडता येते," असे प्रतिपादन कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी केले. ते पोलीस स्मृती दिन कार्यक्रमात बोलत होते. विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती.

21 ऑक्टोबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात सर्व पोलीस मुख्यालयांमध्ये पोलीस स्मृती दिन साजरा केला जातो. कर्तव्य बजावत असताना प्राण गमावणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बलिदानाची आठवण ठेवून त्यांना यावेळी आदरांजली अर्पण केली जाते. कोल्हापूर पोलीस दलाच्या वतीने पोलीस मुख्यालयात पार पडलेल्या या कार्यक्रमात स्मृती स्तंभाला पुष्पचक्र अर्पण करून शहीद पोलीस जवानांना अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी एक मिनिटाचं मौन पाळून कृतज्ञता व्यक्त केली.

पोलीस अधीक्षक गुप्ता यांनी, पोलीस दलातील कर्मचाऱ्यांसाठी मानसिक व शारीरिक आरोग्याचे महत्व यावेळी अधोरेखित केले. दैनंदिन तणावपूर्ण कर्तव्यामुळे आरोग्याकडे दुर्लक्ष होऊ शकते. मात्र, तंदुरुस्त शरीर आणि शांत मन हे कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला समर्थपणे सामोरे जाण्यासाठी अत्यावश्यक आहे, असे ते म्हणाले.

कार्यक्रमाला अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. धीरज कुमार बच्चू, पोलीस उपअधीक्षक तानाजी सावंत, सुवर्णा पत्की, सुजितकुमार क्षीरसागर, तसेच अनेक पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.