निवडणुक आयोगाविरोधात मुंबईत एक नोव्हेंबरला मोर्चा : सर्वपक्षीय विरोधकांची घोषणा

मुंबई - गेल्या काही दिवसांपासून सर्वपक्षीय विरोधक मतदार याद्यातील घोळाबाबत निवडणूक आयोगाविरोधात लढाई लढत आहेत. मात्र निवडणुक आयोग आक्षेप गांभीर्याने घेत नसल्याचा आरोप विरोधक करत आहेत. त्यामुळे निवडणुक आयोगाच्या भ्रष्ट आणि मनमानी कारभारविरोधात शनिवार एक नोव्हेंबर रोजी मुंबईत मोर्चा काढला जाणार असल्याची माहिती, सर्वपक्षीय विरोधकांच्या पत्रकार बैठकीत खासदार संजय राऊत यांनी दिली. या मोर्चातून विरोधक निवडणुक आयोगाला दणका देतील, असा इशाराही त्यांनी दिलाय.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील, काँग्रेसचे सचिन सावंत, मनसेचे बाळा नांदगावकर, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते प्रकाश रेड्डी उपस्थित होते.
दुबार आणि बोगस मतदार आहेत हे सत्ताधारी आमदार सांगत आहेत . महाराष्ट्राच्या यादीत ९६ लाख मतदार अजूनही आमच्या दृष्टीने घुसखोर आहेत. निवडणूक आयोगाच्या मॅच फिक्सिंग विरोधात हा आमचा लढा असल्याचे राऊत यांनी सांगितले. या मोर्चाचे नेतृत्व खा. शरद पवार, माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, राज ठाकरे आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते करणार असल्याचे खा. राऊत यांनी सांगितले.