मतदार याद्यांची फेर तपासणी केल्यास राज्यात एक कोटी दुबार नावे आढळतील – आमदार सतेज पाटील यांचा गंभीर आरोप

कोल्हापूर – विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी आज सकाळी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी दुबार मतदार नावे आणि ‘आनंदाचा शिधा’ योजना बंद करण्यावरून सरकारवर सडकून टीका केली. राज्यातील मतदार याद्यांची फेरतपासणी केली, तर सुमारे एक कोटी दुबार नावे आढळू शकतात, असा गंभीर आरोप करत त्यांनी निवडणूक आयोगाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. केंद्रीय आणि राज्य निवडणूक आयोगांच्या नियमावलीत गोंधळ असून याचा गैरफायदा घेतला जात आहे, असं त्यांनी सांगितलं.
सणानिमित्त सुरू केलेली ‘आनंदाचा शिधा’ योजना आता बंद केलीय. यामागे राज्य सरकारची आर्थिक अडचण आहे. ही योजना फक्त निवडणूक लक्षात घेऊन आणली होती, सरकारचं हे खोटं धोरण समोर आलंय, अशी टीकाही त्यांनी केली. राज्यात ओबीसी आणि मराठा समाजात भांडण लावण्याचे काम भाजप व महायुती सरकार करत आहे, असा आरोप देखील त्यांनी यावेळी केला.