शहराच्या नवीन प्रवेशद्वारासाठी तीन कोटींचा निधी मंजूर करण्यात येणार : आ. राजेश क्षीरसागर

कोल्हापूर - शहराच्या स्वागत कमानीची प्रचंड दुरवस्था झालीय. अनेक ठिकाणी याची पडझड झालीय. धोकादायक स्थितीत कमानीखालून अनेक वाहनांची ये - जा सुरू असल्याने एखादी दुर्दैवी घटना घडण्याची शक्यता होती. दोन दिवसांपूर्वी दुरवस्था झालेल्या कमानीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तात्काळ महानगरपालिकेच्या आयुक्त आणि अधिकाऱ्यांनी कमानीची पाहणी केली होती.
महानगरपालिकेच्या पॅनलवरील स्ट्रक्चरल इंजिनिअर प्रशांत हडकर यांच्याकडून स्ट्रक्चरल ऑडिट करून तात्काळ पुढील कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या होत्या. दरम्यान आज महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ आणि इतर अधिकाऱ्यांच्या सोबत कमानीची पाहणी केली. ही कमान येत्या तीन - चार दिवसात उतरून घेण्याच्या सूचना त्यांनी दिली. या ठिकाणच्या नवीन प्रवेशव्दारासाठी तीन कोटींचा निधी तात्काळ मंजूर करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
यावेळी शहर अभियंता रमेश मस्कर, प्रजासत्ताक सामाजिक संघटनेचे दिलीप देसाई, अविनाश कामते यांच्यासह पालिकेचे अधिकारी उपस्थित होते.