शेतकऱ्यांच्या घामाला योग्य दाम मिळेपर्यंत लढत राहणार : राजु शेट्टी

कोल्हापूर – राज्यातील शेतकऱ्यांच्या घामाला योग्य दाम मिळेपर्यंत लढत राहणार असल्याचे वक्तव्य माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले आहे. राधानगरी तालुक्यातील सरवडे येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या चोविसाव्या ऊस परिषदे निमित्त संपर्क मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.
या मेळाव्यात माजी खासदार राजु शेट्टी यांनी, कारखानदार आणि शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणांवर आपल्या भाषणातून आसूड ओढला. देशाच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य आधारस्तंभ असलेल्या शेतकऱ्यांची लुबाडणूक होत असल्या बद्दल त्यांनी तीव्र शब्दांमध्ये नाराजी व्यक्त केली.
माजी खासदार शेट्टींनी, गेल्या काही वर्षांमध्ये काटामारी, रिकव्हरी चोरी आणि उपपदार्था निर्मितीतून शेतकऱ्यांना लुटले जात आहे, असा आरोप केला. एफ. आर. पीच्या दरात गेल्या पाच वर्षां मध्ये साडेसहाशे रुपयांची वाढ झाली असली तरी ऊस दर मात्र ३,००० ते ३,२०० रुपयांवर स्थिर असून खतं, बियाणं, किटकनाशके यांच्या किंमतीत भरमसाट वाढ झाल्याने ऊस शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळत नसल्याचेही त्यांनी नमूद केले. यावेळी जिल्हाध्यक्ष अजित पोवार यांनी बिद्री साखर कारखान्याच्या व्यवस्थापनावर जोरदार टीका केली. शेतकऱ्यांनी को-जनरेशन प्रकल्पासाठी दिलेली परवानगी हा कारखान्याच्या विकासासाठी केलेला त्याग होता, असे त्यांनी म्हटले आहे.
यावेळी डॉ. बाळासाहेब पाटील, विक्रम पाटील जैनापूरकर, आनंदा पाटील, पांडुरंग जरग, विठ्ठल पाटील, शामराव मोरे, संतोष बुटाले, विजय पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.