मध्यरात्री आमदार क्षीरसागर यांची अचानक भेट – अनुपस्थित अधिकाऱ्यांना सुनावले खडे बोल

कोल्हापूर - शहरातील दयनिय रस्त्यांच्या अवस्थेवर नागरिकांचा वाढता संताप पाहता, काल मध्यरात्री आमदार राजेश क्षीरसागर यांनी अचानकपणे दसरा चौक ते लक्ष्मीपुरी स्वयंभू गणेश मंदिर मार्गावरील रस्त्याच्या कामाची पाहणी केली. या कामाबाबत आठवड्याभरापूर्वीच पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत महत्वाच्या सूचना दिल्या होत्या. यावेळी काम सुरू असताना जबाबदार अधिकारी आणि ठेकेदार उपस्थित असणे अनिवार्य असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, पाहणीवेळी अधिकारी आणि प्रमुख ठेकेदार अनुपस्थित असल्याचे लक्षात येताच आमदार क्षीरसागर यांनी तात्काळ फोनवरून संपर्क साधून त्यांना खडे बोल सुनावले.
“शहरातील रस्त्यांचा दर्जा टिकविणे ही प्रशासन आणि ठेकेदारांची जबाबदारी आहे. यापुढे कोणतीही हयगय खपवून घेतली जाणार नाही,” अशा शब्दांत त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना कामाच्या ठिकाणी हजर राहण्याच्या आणि ठेकेदारांकडून दर्जेदार काम करून घेण्याच्या कडक सूचना दिल्या.