"राजारामपुरीसाठी विशेष ड्रेनेज पॅकेज द्या" - शिवसेना महिला आघाडीची महापालिकेकडे मागणी

<p>"राजारामपुरीसाठी विशेष ड्रेनेज पॅकेज द्या" - शिवसेना महिला आघाडीची महापालिकेकडे मागणी</p>

कोल्हापूर - कोल्हापुरातील सर्वाधिक कर भरणारा आणि व्यापारीदृष्ट्या महत्त्वाचा राजारामपुरी परिसर आजही ६० वर्षांपूर्वीच्या ४ इंची ड्रेनेज लाईनवर चालतोय, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. वाढती लोकवस्ती, अपार्टमेंट्स आणि व्यावसायिक गाळ्यांच्या संख्येमुळे सध्याची ड्रेनेज व्यवस्था पूर्णपणे अपुरी आणि मोडकळीस आली आहे. त्यामुळे शिवसेना (ठाकरे गट) महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख प्रतिज्ञा महेश उत्तरे यांनी महापालिका प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांना निवेदन देत राजारामपुरीसाठी स्वतंत्र "विशेष ड्रेनेज पॅकेज" द्यावे, अशी मागणी केली आहे.

 

१९६७ पासून राजारामपुरी परिसरात फक्त ४ इंची ड्रेनेज लाईन टाकण्यात आली आहे. आज एका बंगल्याच्या जागी ३०-५० फ्लॅट्स उभे राहिले आहेत. दररोज रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात सांडपाणी वाहत असल्याने याच्या दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त आहेत. शोरूम्स, दुकाने, अपार्टमेंट्स यामुळे भार वाढला असून महापालिकेने नवीन ड्रेनेज लाईन टाकण्याचा प्रयत्न केला नाही. नवीन भागांतून येणारे मोठ्या ड्रेनेज लाईन्सचे कनेक्शनही आता राजारामपुरीच्या जुन्या लाईनला जोडले जाणार आहेत. यामुळे संपूर्ण सिस्टम कोलमडण्याचा धोका आहे. त्यामुळे आता २४ ते ३० इंची नवीन ड्रेनेज लाईन टाकावी. राजारामपुरीतील सर्व प्रभागांसाठी स्वतंत्र विशेष पॅकेज मंजूर करावे. नवीन बांधकामांना परवानगी देताना ड्रेनेज फंडाची तरतूद बंधनकारक करावी. जिल्हा नियोजन समितीतून निधी उपलब्ध करून द्यावा. अशी मागणी माजी परिवहन सभापती प्रतिज्ञा महेश उत्तुरे यांनी केली आहे.

 

“दरवर्षी राजारामपुरीतून महापालिकेला सुमारे १० कोटींहून अधिक कर जमा होतो. तरीही सुविधा मिळत नाहीत, हे दुर्दैव आहे. सरकार व प्रशासनाने याकडे तत्काळ लक्ष द्यावे.” असे मत प्रतिज्ञा उत्तुरे यांनी व्यक्त केलंय. याबाबत प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली असून यासाठी लवकरच सार्वजनिक जनआंदोलन उभारण्याचा इशाराही उत्तुरे यांनी दिला आहे.