"शाळांमध्ये रॅगिंगचं सावट? जुने व्हिडिओ पुन्हा उघड करत आहेत धक्कादायक वास्तव"

पेठवडगाव - कोल्हापूर जिल्ह्यातील तळसंदे येथील शिक्षण संस्थेतील मारहाणीचा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाल्यानंतर जिल्ह्यात संतापाची लाट उसळली होती. दरम्यान, पेठवडगाव परिसरातील एका शाळेतील विद्यार्थ्यांकडून मारहाण केल्याचा आणखी एक व्हिडिओ पुन्हा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये १० ते १२ विद्यार्थी एका विद्यार्थ्याला हाताने मारहाण करताना दिसतात. या प्रकारानंतर समाजामधून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.
तळसंदे येथील हॉस्टेलमधील मारहाणीचा जुना व्हिडिओ नुकताच व्हायरल झाला होता. त्यानंतर आता पेठवडगावातील व्हिडिओमुळे जिल्ह्यातील शाळांतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. वास्तविक घटना घडल्यानंतर संबंधित शाळा प्रशासन किंवा पोलीस यंत्रणेला ही माहिती दिली गेली असती तर दोषींवर तत्काळ कठोर कारवाई होऊ शकली असती. मात्र, तसे न झाल्याने असे प्रकार वारंवार घडल्याचे दिसून येते. दरम्यान, शाळांमध्ये सुरक्षा यंत्रणा अधिक सक्षम कराव्यात, CCTV प्रणाली कार्यान्वित ठेवावी, विद्यार्थ्यांमध्ये मानसिक आरोग्यविषयक जागरूकता वाढवावी आणि समुपदेशन करावे , अशी मागणी सामाजिक संघटना आणि पालकांकडून होत आहे.