"मुख्यमंत्री साहेब, आपणही सहभागी व्हा" – खासदार संजय राऊत यांचे फडणवीस यांना पत्र

कोल्हापूर - मुंबई महानगर पालिकेसह राज्यातील जिल्हा परिषद, नगरपालिका आणि अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तारखा लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेसंदर्भात चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळ मंगळवारी १४ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी १२.३० वाजता राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांची भेट घेणार आहे. या शिष्टमंडळात शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह विविध पक्षांचे नेते सहभागी होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे गट) चे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवत या शिष्टमंडळात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
पत्रात खा. राऊत म्हणतात, “या निवडणुका अत्यंत महत्त्वाच्या असून त्या पारदर्शक, निष्पक्ष आणि संविधानबद्ध पद्धतीने पार पडाव्यात, ही सर्वच पक्षांची भूमिका आहे. सध्याच्या प्रक्रियेबाबत काही शंका उपस्थित होत असून त्यावर चर्चा करण्यासाठी ही भेट आहे. या भेटीमागे कोणताही राजकीय हेतू नाही. लोकशाही बळकट व्हावी व निवडणूक यंत्रणेवरील जनतेचा विश्वास वाढावा, हीच यामागील भूमिका आहे.”
राऊत यांनी पत्राच्या शेवटी नम्र विनंती करत , “आपल्या (मुख्यमंत्र्यांच्या) उपस्थितीमुळे शिष्टमंडळाची प्रतिष्ठा वाढेल.” असं म्हटलं आहे.