गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा 

अनिल परब यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी 

<p>गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा </p>

मुंबई - राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ याचा सख्खा भाऊ सचिन घायवळ याला शस्त्र परवाना दिल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी केला आहे. यावर त्यांनी ‘तात्काळ योगेश कदम यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा’, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.  जर या प्रकरणावर कारवाई झाली नाही, तर शिवसेनेला लोकांच्या सुरक्षिततेसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
हा प्रकार म्हणजे पैशांसाठी केलेली ‘मेहेरबानी’ असून, मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेला काळीमा फासण्याचे काम आहे. त्यांनी  तो दोषमुक्त आहे म्हणून त्याला शस्त्रपरवाना देणं चुकीचं आहे. समजा उद्या दाऊद जर दोषमुक्त ठरला तर त्यालाही तुम्ही शस्त्रपरवाना देणार का असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. 
ज्या व्यक्तीवर बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, खून आणि खंडणीचे आरोप आहेत, त्याला गृहराज्यमंत्री परवाना देतात म्हणजे ते गुंडांना पाठबळ देत आहेत. "हा माणूस बांधकाम कंपनीशी संबंधित काम करतो म्हणून त्याला रोख रक्कम बाळगावी लागते, म्हणून त्याला परवाना दिला गेला," या मंत्र्यांच्या भूमिकेवर परब यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.