पाणी बिले वाटपातील विलंबाचा भुर्दंड नागरिकांवर नको – आपचा जलविभागाला इशारा

चुकीची बिले त्वरित दुरुस्त करण्याची मागणी, दंड व्याज रद्द न केल्यास आंदोलनाचा इशारा

<p>पाणी बिले वाटपातील विलंबाचा भुर्दंड नागरिकांवर नको – आपचा जलविभागाला इशारा</p>

कोल्हापूर – शहरातील पाणी बिले वाटपात गेल्या सहा महिन्यांपासून होत असलेल्या विलंबामुळे नागरिक त्रस्त झाले असून, याचा भुर्दंड सामान्य ग्राहकांना न बसवता दुरुस्ती व दंडमाफीत त्वरित निर्णय घ्यावा, अशी मागणी आम आदमी पार्टीने (आप) जल अभियंत्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.


मीटर रीडरांची कमतरता, नादुरुस्त स्पॉट बिलिंग मशिन्स, तसेच काही कर्मचाऱ्यांचा कामचुकारपणा यामुळे अनेक भागांमध्ये वेळेत पाणी बिले वितरित झाली नाहीत. यामुळे नागरिकांच्या हातात एकाचवेळी तीन ते सहा महिन्यांची बिले आली असून, त्यावर दंड व व्याज आकारण्यात आले आहे, ही अन्यायकारक बाब त्वरित थांबवण्याची गरज आपने अधोरेखित केली. राजारामपुरी, सम्राटनगर, उत्तरेश्वर पेठ अशा भागांमध्ये बिले वेळेवर न मिळाल्याचे नमूद करत, शहराध्यक्ष उत्तम पाटील यांनी "महापालिकेच्या चुकीचा भुर्दंड नागरिकांना का?" असा थेट सवाल यावेळी उपस्थित केला. 


बैठकीत जल अभियंता हर्षजीत घाटगे यांनी, ५५ नवीन स्पॉट बिलिंग मशीन मागवण्यात आली असून ती पुढील आठवड्यात उपलब्ध होतील, चुकीच्या व विलंबित रीडिंगबद्दल मीटर रीडरांना नोटीस बजावण्यात आल्यात, दंड व व्याजाची वसुली संबंधित कर्मचाऱ्यांकडून करण्याची प्रस्तावित कारवाई आहे, संबंधित भागांतील नागरिकांची बिले दुरुस्त करण्यात येतील आणि दंड-व्याज माफ करण्यात येईल असं शिष्टमंडळाशी संवाद साधताना सांगितले. दरम्यान, दंड माफ करून बिले पूर्ववत न केल्यास, रस्त्यावर उतरून आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी आप शिष्टमंडळाने दिला.

या शिष्टमंडळात उपाध्यक्ष सूरज सुर्वे, महासचिव अभिजित कांबळे, दुष्यंत माने, विजय हेगडे, संजय नलवडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.