महायुती सरकारची मदत म्हणजे शब्दांमधून दिलासा अन् हिशोबात फसवणूक: आ. सतेज पाटील यांची टीका

कोल्हापूर – मराठवाड्यात महापुराने जी शेती उध्वस्त झाली, त्यावरील पीककर्ज माफ होणार नाहीच, उलट या कर्जाचे पुनर्गठन होऊन शेवटी तो भार शेतकऱ्यावरच येणार आहे. त्यामुळे राज्य सरकारची घोषणा झाली खरी; पण शासनाच्या जीआरमधील अटी- शर्तीं लागू होऊन शेवटी शेतकऱ्याच्या हातात काहीच पडणार नसल्याचे काँग्रेसचे विधानपरिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर मदतीच्या घोषणेवरून हल्लाबोल केला.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत अपेक्षित असताना महायुती सरकारने जाहीर केलेली नुकसान भरपाई तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार आहे. जमीन खरडून गेलेल्या शेतकऱ्याला ३.४७ लाखांची मदत मिळेपर्यंत मनरेगामध्ये मजुरी करावी लागणार. हा प्रकार म्हणजे शेतकऱ्यांची थट्टाच आहे. त्यामुळे महायुती सरकारने ही मदत जाहीर करुन शब्दांमधून दिलासा आणि हिशेबात फसवणूक केली असल्याची टीका आमदार सतेज पाटील यांनी केली आहे.