'महापालिकेतील बैठक म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा' — आम आदमी पार्टी चा आरोप

<p>'महापालिकेतील बैठक म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा' — आम आदमी पार्टी चा आरोप</p>

कोल्हापूर - शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था, अनियमित पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापनातील ढिसाळपणा, अपूर्ण व दर्जाहीन रस्ते प्रकल्प यासारख्या समस्या गेल्या अनेक वर्षांपासून कायम आहेत. याच प्रश्नांवर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार राजेश क्षीरसागर आणि आमदार अमल महाडिक यांच्या उपस्थितीत नुकतीच महापालिकेत आढावा बैठक झाली. मात्र, ही बैठक म्हणजे ‘चोराच्या उलट्या बोंबा’ असल्याची टीका आम आदमी पार्टीने केली आहे. पार्टीचे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई आणि शहराध्यक्ष उत्तम पाटील यांनी यासंदर्भात पत्रक प्रसिद्ध केलं आहे.

 

➡️ नेमकं निवडणुकीच्या तोंडावरच जाब का? ...

नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून या प्रश्नांना तोंड देत आहेत, मग नेमकं निवडणुकीच्या तोंडावरच अधिकाऱ्यांना धारेवर धरण्याची आठवण आमदारांना का झाली? निधी आणणं आमचं आणि अंमलबजावणी अधिकाऱ्यांची असं सांगून जबाबदारी टाळली जात आहे. सत्तेत असताना अधिकारी जर तुमचं ऐकत नसतील तर त्याला जबाबदार कोण, असा प्रश्नही आप नेत्यांनी पत्रकात विचारला आहे.

 

➡️ ड्रेनेज घोटाळ्यापासून स्लॅब कोसळल्यापर्यंत... कारवाई कुठं?..

ड्रेनेज घोटाळ्यावर आरोप झाले तरी कारवाई झालेली नाही. स्लॅब कोसळून जीवितहानी झाली, तरी प्रशासन वा सत्ताधाऱ्यांना त्याचं कोणतंही सोयरसुतक नाही.

 

➡️ भूतकाळातील पदाधिकारीही जबाबदार...

बैठकीत उपस्थित काही माजी पदाधिकाऱ्यांनी गेली २० वर्षे सत्तेची पदं भूषवल्याचं सांगत त्यांच्यावरही गंभीर आरोप करण्यात आले आहेत. महापालिकेच्या पहिल्या मजल्यावर "भ्रष्टाचारी पिशाच्छ" वावरत असल्याची टीका करत, आजवर त्यांचा नायनाट का झाला नाही, असा सवाल पत्रकात उपस्थित केला आहे.

 

➡️ कोल्हापूरची जनता या थोतांडाला कंटाळली...

जर कुंपणच शेत खात असेल, तर नागरिकांची दिशाभूल करणाऱ्या अशा बैठका थांबवाव्यात,अशी तीव्र भूमिका आम आदमी पार्टी ने घेतली आहे.

 

➡️ निवडणूकपूर्व राजकारण?...

या टीकेमुळे महापालिकेतील सत्ताधाऱ्यांवर दबाव वाढणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. निवडणूकपूर्व काळात होणाऱ्या बैठका, निधीच्या घोषणा आणि प्रश्नांवर राजकीय शब्दांचे आदानप्रदान हे आगामी राजकारणाचा भाग असल्याचं स्पष्ट होत आहे.